बलून बंधाऱ्यांसाठी गिरणा परिक्रमा सुरू 

जळगाव ः गिरणा नदीवर प्रस्तावित बलून बंधाऱ्यांबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात, गिरणा नदीमधील अवैध वाळू उपसा थांबावा व इतर मागण्यांसाठी जळगाव लोकसभाचे खासदार उन्मेष पाटील व शेतकऱ्यांनी गिरणा परिक्रमा सुरू केली आहे.
बलून बंधाऱ्यांसाठी गिरणा परिक्रमा सुरू 
Mill circuit begins for balloon dams

जळगाव ः  गिरणा नदीवर प्रस्तावित बलून बंधाऱ्यांबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात, गिरणा नदीमधील अवैध वाळू उपसा थांबावा व इतर मागण्यांसाठी जळगाव लोकसभाचे खासदार उन्मेष पाटील व शेतकऱ्यांनी गिरणा परिक्रमा सुरू केली आहे.  कानळदा (ता.जळगाव) येथे या परिक्रमेला सुरवात झाली. या वेळी जलपुरूष राजेंद्रसिंह, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, डॉ.राधेश्याम चौधरी, पंचायत समितीचे सदस्य हर्षल चौधरी, गोपाळ भंगाळे, अनिल सपकाळे आदी उपस्थित होते. गिरणा परिक्रमा कानळदा येथून फुपनगरी, वडनगरी, खेडी खुर्द व आव्हाणे येथे पोचली. तेथून सर्व मंडळी जळगाव येथे पोचली. सुमारे १७ किलोमीटर एवढे अंतर सर्वांनी पायी चालून पार केले. जळगाव शहरातील नियोजन भवनात सायंकाळी कार्यक्रम झाला. यात खासदार पाटील व इतरांनी आपली भूमिका मांडली. ही परिक्रमा सुरूच राहणार आहे. दर शनिवारी व रविवारी ही परिक्रमा गिरणा काठच्या गावांमध्ये जावून केली जाईल. रामेश्वर (ता.जळगाव) येथे तापी व गिरणा नदीच्या संगमावर या परिक्रमेचा समारोप होईल.  राजेंद्रसिंह यांनी गिरणा नदीचे संवर्धन व्हावे याबाबत आवाहन केले. शेतकरी, ग्रामस्थ यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. नदीचे संवर्धन झाल्यास पुढे नदीकाठची संस्कृती टिकाव धरेल. अन्यथा नदीचे अस्तिस्त धोक्यात येईल आणि त्यावर आधारीत जीव, सृष्टीदेखील नष्ट होईल, असे सांगितले. खासदार पाटील यांनी गिरणा बचाव अभियान हे शेतकरी, ग्रामस्थांचे आहे. ही परिक्रमा करून जनमत संकलित केले जाईल व गिरणा नदीवर प्रस्तावित बलून बंधाऱ्यांचे काम सुरू करण्यासाठी शासनाकडे मागणी केली जाईल. ग्रामस्थांच्या सह्या घेतल्या जात असून, या सह्या व निवेदन राज्याच्या पर्यावरण विभागाला दिले जाईल. पर्यावरण मंत्रालयात बलून बंधाऱ्यांच्या मंजुरीचा प्रस्ताव गेले आठ महिने पडून आहे. त्यावर शेतकरी हिताच्या दृष्टीने निर्णय घेतला जावा, अशी मागणी यानिमित्त केली जाईल, असेही खासदार म्हणाले.  बलून बंधारा प्रकल्प गिरणा पट्ट्यासाठी अतिशय आवश्यक आहे. पण राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने मंजुरी दिलेली नसल्याने अडचणी आहेत. आमची मागणी शासनापर्यंत पोचविण्यासाठी गिरणा परिक्रमा अभियान उपयुक्त ठरेल.  - चंद्रकांत जाधव, शेतकरी, फुपनगरी, ता.जि.जळगाव  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com