
शिरपूर, जि. धुळे : पिकांना पाणी देण्याच्या ऐन हंगामात वीज वितरण कंपनीने थकबाकीमुळे रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केल्याने संतप्त झालेल्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी शिरपूर शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या दिला. उपकार्यकारी अभियंता डी. एम. पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सायंकाळी शेतकरी माघारी फिरले. मात्र समाधानकारक तोडगा निघू शकला नव्हता.
वीज वितरण कंपनीकडून थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू असून, दोन दिवसांत पूर्व भागातील सुमारे ५८ रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पिकांना पाणी देण्यासाठी अखेरचे दोन आठवडे शिल्लक असतानाच वीजपुरवठा कापल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी धुळे जिल्हा जागृत जनमंचाच्या डॉ. सरोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिनगर येथील वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाबाहेर ठिय्या दिला. तेथील अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी संबंधितांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. तेथे शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर कैफियत मांडली. नोटीस न देताच वीज कापली शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वीजपुरवठा कापण्यापूर्वी वीज वितरण कंपनीने नोटीस देणे गरजेचे होते. कंपनीने मागणी केल्यानुसार, शेतकऱ्यांनी नुकत्याच पाच हजारांच्या रकमा बिलांपोटी भरल्या. त्याची पोहोचपावतीही मिळालेली नाही. पैसे भरून घेतल्यानंतर वीजपुरवठा कापला आणि आता पुन्हा पैसे भरण्यास सांगण्यात येत आहे. त्यालाही शेतकरी तयार आहेत; पण कंपनीकडून सवलत मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांपैकी काही जण आमदार काशीराम पावरा यांच्या कार्यालयात पोहोचले. त्यांच्याकडून माहिती घेतल्यावर आमदार पावरा यांनी अभियंता डी. एम. पाटील यांच्याशी संपर्क साधला. पाटील यांनी नियमानुसारच कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. आमदार पावरा यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन सहकार्याची भूमिका ठेवा, असे निर्देश दिले. डॉ. सरोज पाटील, वीज ग्राहक संघटनेचे तालुकाध्यक्ष गोपाल मारवाडी, मोहन पाटील, हेमराज राजपूत, युवराज राजपूत आदींनी डी. एम. पाटील यांच्याशी चर्चा केली. सप्टेंबर २०२० पर्यंतची थकीत वीजबिले गोठवली (कारवाईशिवाय ‘जैसे थे’) असून, त्यानंतरच्या बिलांची नियमित वसुली करण्याचे आदेश आहेत. आतापर्यंत पाच बिले दिली असून, त्यापैकी चार बिलांचा भरणा केल्यास कोणाचाही वीजपुरवठा खंडित होणार नाही. तालुक्यात सरासरी पाच अश्वशक्तीच्या मोटारी वापरल्या जातात. त्यामुळे एका बिलासाठी सरासरी पाच हजार रुपये स्वीकारले जातात. बिल भरल्यानंतर भरणा पावती लगेचच मागून घ्यावी किंवा स्वत: भरणा करावा. वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही सुरू आहे. सप्टेंबर २०२० अखेरची थकबाकी भरण्यासाठी मार्च २०२४ पर्यंत मुदत आहे. - डी. एम. पाटील, उपकार्यकारी अभियंता
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.