वाशीमलाही मिळाला १५ कोटींचा वाढीव निधी

जिल्ह्यातील विकासकामांना निधीची गरज लक्षात घेऊन राज्याच्या वित्त विभागाकडून मागासलेपण दूर करण्यासाठी यंत्रणांना १५ कोटी रुपयांचा निधी वाढवून देण्यात आला आहे.
Washim also got an additional fund of Rs 15 crore
Washim also got an additional fund of Rs 15 crore

वाशीम ः जिल्ह्यातील विकासकामांना निधीची गरज लक्षात घेऊन राज्याच्या वित्त विभागाकडून मागासलेपण दूर करण्यासाठी यंत्रणांना १५ कोटी रुपयांचा निधी वाढवून देण्यात आला आहे. जिल्ह्याचा नितव्यय १८५ कोटी रुपये होता. आता त्यामधे वाढ करून २०० कोटी रुपये करण्यात आले आहे.  जिल्‍हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ अंतर्गत वाशीम जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी सोमवार (ता.२४) राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचा आढावा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी घेतला. पालकमंत्री शंभूराज देसाई व मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. आकोसकर व श्री. मापारी आदिंची उपस्थिती होती. वाशीम जिल्ह्याला जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांना सांगण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले. जिल्ह्यात सर्वसाधारण योजनेसोबत अनुसूचित जाती उपयोजना तसेच आदिवासी क्षेत्रबाह्य योजनांची यंत्रणांनी यशस्वीरीत्या अंमलबजावणी करावी. सन २०२१ -२२ या वर्षासाठी सर्वसाधारण योजनांसाठी १८५ कोटी रुपये नियतव्यय मंजूर आहे. सन २०२-२३ च्या सर्वसाधारण योजनेच्या निधीत १५ कोटी रुपयांची वाढ करून तो आता २०० कोटींचा राहील. जिल्हाधिकारी यांनी पुढील आर्थिक वर्षांसाठी २०० कोटींच्या खर्चाचे नियोजन करावे, असे बैठकीत निर्देशित करण्यात आले.  जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी जिल्ह्याचा समावेश केंद्र सरकारने आकांक्षित जिल्ह्यामध्ये केला आहे. यंत्रणांनी आयपास प्रणालीचा १०० टक्के वापर करावा. जिल्हा नियोजन समितीच्या सभा वेळेवर घेऊन कामांना प्रशासकीय मान्यता वेळेत द्याव्यात. नावीन्यपूर्ण योजनांची जिल्ह्यात चांगल्याप्रकारे अंमलबजावणी करावी. सन २०२१-२०२२ यावर्षीचा जिल्ह्याचा नियतव्यय १८५ कोटी रुपयांचा आहे. सन २०२२-२०२३ या वर्षांचा नियतव्यय १५७ कोटी रुपयांपेक्षा कमी असताना चालू वर्षाच्या १८५ कोटी रुपये एवढाच पुढील वर्षी देखील नियतव्यय १८५ कोटी रुपयांचा ठेवून त्यामध्ये आणखी १५ कोटी रुपयांची भर घालून तो २०० कोटी रुपये मंजूर करण्यात येत असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.  पालकमंत्री देसाई यांनी, जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जलसंधारणाची चांगल्या प्रकारची कामे करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. आरोग्यासाठी निधी मिळाला. जिल्ह्यात पायाभूत सुविधा अपूर्ण असल्यामुळे त्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली. जिल्हापरिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी आकांक्षित जिल्हा म्हणून वाशीम जिल्ह्याला जो निधी उपलब्ध होतो, त्यामधून प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, जलसंधारणाची कामे तसेच पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर खर्च करण्यात येतो. यासाठी अधिक निधी जिल्ह्याला येत्या आर्थिक वर्षात उपलब्ध व्हावा अशी मागणी केली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com