कृषी(चं) प्रदर्शन

दिवसभर मनापासून शेतात राबायचं आणि संध्याकाळी मित्रांच्या घोळक्यात, पारावर गप्पांचा फड रंगवायचा हा वर्षानुवर्षांचा दिनक्रम.
कृषी(चं) प्रदर्शन
agri exhibition

प्रदर्शनात कंपन्यांचे प्रतिनिधी बारीवर नोटा उधळाव्या तसे प्रॉडक्टचे माहितीपत्रक वाटत होते. ते घेण्यासाठी लोकांची झुंबड उडत होती. जितुदादा आणि मंडळ त्या गर्दीत घुसलं. एकदा का माहितीपत्रक हातात पडलं की, त्याला पिशवीत कोंबायचं आणि पुढच्या स्टॉलसमोरच्या गर्दीत घुसायचं, अशी त्यांची कसरत सुरु होती. जितुदादा हा गावातील तरुणांचा नेता (leader). वडिलोपार्जित वीस एकर शेती. दावणीला गाय (cow), बैल (bull) असा पारंपरिक पसारा. जुनं ते सोनं असतं असं म्हणत, आजोबांनी वडिलांना आणि वडिलांनी जितुदादाला सांगितलेल्या मार्गावर तो मनोभावे शेतीत (farming) राबत राहिला. जितुदादा तसा मेहेनती. दिवसभर मनापासून शेतात राबायचं आणि संध्याकाळी मित्रांच्या घोळक्यात, पारावर गप्पांचा फड रंगवायचा हा वर्षानुवर्षांचा दिनक्रम. देशमुखांचा तुषार पाच-सहा वर्षे खासगी कंपनीत काम करत होता. त्याची प्रगती पाहून, कंपनीने त्याला एका प्रोजेक्टसाठी परदेशी पाठवलं होतं. तिकडची शेती पाहून आल्यावर, तो नोकरी सोडून गावाकडं शेती करायला आला होता. देशमुखांचा त्याला विरोध होता. पण एकुलकत्या एक पोरापुढे आणि (खास करून) त्याच्या आईपुढे देशमुखी चालणार नाही याची त्यांना खात्री होती. पोरगा गावात आला. आधुनिक शेती, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग वगैरे मोठमोठे इंग्रजी शब्द बोलू लागला. घरातला, ‘भीषण अपघात आणि बकरीला झाली दहा पिल्लं’ अशा मनोरंजक बातम्यांचा पेपर बंद झाला. आधुनिक शेतीची माहिती देणाऱ्या ‘ॲग्रोवन'ची एंट्री झाली. हे ही वाचाः  आनंददायी शेती तुषार आणि जितुदादा दहावीपर्यंत गावच्या शाळेत एकाच वर्गात शिकलेले. पण लहानपणापासून दोघांचे विचार कधी जुळले नाहीत. तुषार गावात परत आला; पण जितुदादाच्या तरुण मंडळात त्याला जागा मिळाली नाही आणि तोही तिकडे फिरकला नाही. जितुदादाच्या ग्रुपमध्ये, ‘अरे चार बुकं वाचली, फॉरेनला जाऊन आला, म्हणजे काय दिवे लावले!’ ‘पेपर वाचून शेती होते का?’ असे टोमणे मारले जाऊ लागले. तुषार समजुतदार होता. तो शांततेत आपल्या प्रोजेक्टवर काम करू लागला. जिल्ह्याला कृषी प्रदर्शन भरलं होतं. जितुदादा आणि मंडळ लै उत्साहात. आपल्या मित्रांना घेऊन जितुदादाने प्रदर्शनाला जायचं ठरवलं. एका मित्राची गाडी काढली आणि जिल्ह्याचं शहर गाठलं. मंडळ प्रदर्शनाच्या जागी पोहोचलं. प्रदर्शन जोरात होतं. वेगवेगळ्या कंपन्यांचे, विद्यापीठांचे, शासनाच्या कृषी विभागाचे आणि सहकारी संस्थांचे स्टॉल लागले होते. त्यांचे प्रॉडक्ट आणि तंत्रज्ञान तिथं मांडलं होतं. प्लॅस्टिकच्या पाट्या आणि बादल्या आपटूआपटू, त्याच्या आवाजाएवढेच कर्कश ओरडून मार्केटिंग करणाऱ्यांचा आवाज प्रवेशालाच प्रदर्शन जोरदार असल्याचा भास निर्माण करत होता. चटपटीत भडंग, चणे-फुटाणे, फटाफट कांदे-बटाटे कापून देणारे मशीन, फटक्यात फरशीवर पडलेलं पाणी शोषून घेणारा स्पंजचं कापड विकणारे, गोंदवणारे, बॅटरीवर चालणारी मुलांची खेळणी विकणारे यांची देखील रेलचेल होती. ट्रॅक्टरच्या स्टॉलवर, नऊवारी नेसलेल्या बायका ठसकेबाज लावण्यांवर नाचत गर्दी जमा करत होत्या. काही स्टॉलवर वेगवेगळे गेम ठेवले होते. जिंकणाऱ्याला साबण, खेळणे यासारखी बक्षिसं मिळत होती. फ्री सॅम्पल आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या वाटणाऱ्या स्टॉलवर विशेष गर्दी होती. एकूण प्रदर्शनाची जत्रा चांगलीच फुलली होती.   हे ही वाचाः  पांढरं सोनं उद्योगाच्या डोळ्यात का खुपतंय?

जितुदादा आणि मंडळाने एंट्रीलाच, पाट्या आपटणाऱ्यांच्या स्टॉलवरील पाट्या जोरजोरात जमिनीवर आपटून पाहिल्या. ‘च्या मायला, लै मजबूत हाई रं!’ म्हणत पाटी आपटताना फेसबुकसाठी व्हिडिओ काढून घेतला. प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या स्टॉलवर परत-परत जाऊन दरडोई तीन-चार पिशव्या घेतल्या. गडी गेमच्या स्टॉल वर चांगले तासभर गेम खेळले. दोन साबणाच्या वड्या आणि एक खेळणं जिंकले; त्यामुळे बायको आणि पोरगा, दोघांच्या कामाच्या वस्तू मिळाल्याचा आनंद सेल्फी काढून साजरा केला. ट्रॅक्टरच्या स्टॉलवर ठसकेबाज लावणीचा आनंद घेत मनमुराद शिट्या वाजवल्या. ‘लै भारी!’ म्हणत कारभारणीला खुश करण्यासाठी कांदे-बटाटे कापायचं एक मशीन घेतलं. म्हाताऱ्यासाठी चटपटीत भडंगचं पाकिट घेतलं. गुडघा टेकून बसलेल्या, छाती फाडणाऱ्या हनुमानाचं चित्र उजव्या दंडावर गोंदवून घेतलं. प्रदर्शनात कंपन्यांचे प्रतिनिधी बारीवर नोटा उधळाव्या तसे प्रॉडक्टचे माहितीपत्रक वाटत होते. ते घेण्यासाठी लोकांची झुंबड उडत होती. जितुदादा आणि मंडळ त्या गर्दीत घुसलं. एकदा का माहितीपत्रक हातात पडलं की, त्याला पिशवीत कोंबायचं आणि पुढच्या स्टॉलसमोरच्या गर्दीत घुसायचं, अशी त्यांची कसरत सुरु होती. ‘लै थकलो बुवा प्रदर्शन पाहून!’ असं म्हणत मंडळ खाद्यपदार्थांच्या स्टॉलकडे सरकलं आणि मस्तपैकी चमचमीत जेवणावर ताव मारला. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. मंडळीने गाडीला स्टार्टर मारला आणि गावाकडे कूच केलं. तुषारच्या प्लॅनमध्येही प्रदर्शनभेट होती. त्याने आठवडाभर अगोदर प्रदर्शनाच्या वेबसाईटला भेट दिली. त्यातील नकाशावरून, कोणकोणत्या कंपन्या आणि संस्थांचे स्टॉल असणार आहेत आणि त्यांचा स्टॉल नंबर काय आहे, हे शोधून काढलं. आपल्याला नेमकी कोणत्या प्रॉडक्ट आणि तंत्रज्ञानाची माहिती हवी आहे याची यादी करून, नेमक्या त्या स्टॉलवाल्या कंपन्यांचे नंबर आणि इमेल पत्ते शोधून काढले. त्या कंपन्यांना संपर्क करून त्यांच्या प्रतिनिधींसोबत मिटिंगसाठी नेमकी वेळ मागून घेतली. घरून डायरी, पेन घेऊन, कोणाबरोबर कोणते मुद्दे मांडायचे आहेत याची उजळणी करून, सकाळी नऊच्या सुमारास प्रदर्शन गाठलं. तुषारने सर्वात आगोदर ठरलेल्या मिटिंग संपवल्या. प्रतिनिधींबरोबर चर्चा केल्या. त्यांच्या प्रॉडक्टची प्रात्याक्षिकं गावात येऊन देण्यासाठी बोलणी केली. उत्पादनाच्या किमती आणि नेमक्या रिझल्टची माहिती घेतली. त्यानंतर आवश्यक त्या स्टॉलला भेटी दिल्या. डायरीत नोंद करून घेतली. माहितीपत्रक गोळा कण्याच्या भानगडीत न पडता, हव्या त्या उत्पादनाच्या माहितीपत्रकाचा फोटो मोबाईलमध्ये काढून घेतला. संध्याकाळपर्यंत हातात एकही माहितीपत्रक न घेता, माहितीचा खजिना घेऊन घरी परतला. जितुदादाच्या मंडळाची, दुसऱ्या दिवशी पहाटे-पहाटे शेकोटीवर अंग शेकताना, प्रदर्शन किती भारी होतं आणि काय मज्जा केली यावर जोरदार चर्चा सुरु होती. प्रदर्शन पाहणं किती महत्वाचं यावर जितुदादाने मस्तपैकी भाषण देखील ठोकलं. प्रदर्शनात जमा केलेले माहितीपत्रकं शेकोटीच्या आगीत सारली जात होती. पुढच्या वर्षीच्या प्रदर्शनात अजून काय काय करायला पाहिजे याचे प्लॅन बनत होते. या माहितीपत्रकांनी मात्र घरातील सर्वांना खुश केलं होतं. शाळेच्या प्रोजेक्टसाठी रंगेबेरंगी चित्रं मिळाली म्हणून पोरगा खुश होता. बापाला तपकीर लावायला आणि उरलेल्या तपकिरीची पुडी बांधून खांबाच्या फटीत खोचून ठेवायला मजबूत कागद मिळाला होता, म्हणून बाप खुश. बायकोला सकाळी-सकाळी चूल पेटवायला आणि मूल बसवायला चांगला कागद मिळाला होता म्हणून ती खुश. आणि एक दिवस प्रदर्शनाची जत्रा एन्जॉय करायला मिळाली म्हणून जितुदादा आणि मंडळ खुश. दुसरीकडे, तुषारने मोबाईलमधले फोटो पाहून त्यातून नोंदी काढल्या. शासनाच्या स्टॉलवरून फार्मर प्रोड्युसर कंपनी काढण्याच्या योजनेवर चर्चा केली होती, त्याची योजना बनवली. बियाणे, कीटकनाशकं आणि खताच्या कंपन्यांच्या वेळा घेऊन प्रात्यक्षिकं लावली. सेंद्रिय प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थेला सर्टीफिकेशनसाठी आमंत्रित केलं. मार्केटिंगसाठी एका कंपनीबरोबर करार केला. प्रदर्शनात ज्यांना ज्यांना भेटला त्यांना, धन्यवादचा मेसेज आणि इ-मेल केला. अशा पद्धतीने जितुदादा आणि तुषार आनंदाने शेती आणि तिचं प्रदर्शन करू (मांडू) लागले...! (या कहाणीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याही चर-अचर, सजीव-निर्जीव, व्यक्ती अथवा घटनेशी काडीचाही संबंध नाही. योगायोगाने आपल्याला काही साधर्म्य वाटल्यास तो भास समजावा आणि चिंतन करावे ही विनंती.) (लेखक ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. लि. कंपनीचे संचालक आणि  आणीड्रीमर अँड डुअर्स या पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.