बेदाणा तारण योजनेसाठी बँकेकडून १० कोटी

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बँक ऑफ इंडियाच्या विद्यमाने तासगाव तालुक्यात बेदाणा तारण योजना सुरू करण्यात आली आहे.
10 crore from bank for raisin mortgage scheme
10 crore from bank for raisin mortgage scheme

तासगाव, सांगली ः  तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बँक ऑफ इंडियाच्या विद्यमाने तासगाव तालुक्यात बेदाणा तारण योजना सुरू करण्यात आली आहे. बँकेच्या माध्यमातून शेतीमाल तारण योजना राबविणारी तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पहिली ठरली आहे. पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येत आहेत.  तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन २००६ पासून कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून अशा प्रकारे पहिल्यांदा बेदाण्यासाठी सहा टक्के व्याज दराने कृषिमाल तारण योजना सुरू केली होती. सन २००६ ते २०१३ पर्यंत १६ कोटींची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली होती. ही योजना यशस्वीपणे राबवल्याबद्दल १० लाख रुपयांचे अनुदान मिळाले होते. हे अनुदानही शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते.  या पार्श्‍वभूमीवर आता बँक ऑफ इंडियाने पुढाकार घेतला आहे. बँकेच्या माध्यमातून व बाजार समितीच्या वसुलीहमीवर कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवलेल्या बेदाण्यावर माल तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेल्या बेदाण्याच्या रिसिटवर ३ लाखांपर्यंत पावणे ८.७५ टक्के दराने, तीन लाखांवर ९.०५ टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका शेतकऱ्यास ९ लाखांपर्यंत त्यातून कर्ज उपलब्ध होईल. स्टोअरेजचालकांना बाजार समितीबरोबर करार करावा लागेल. सध्या शेतकऱ्यांना बेदाणा तारणासाठी १३ ते १६ टक्के व्याजाने बँका आकारणी करतात. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांना फायद्याची ठरणार आहे.  बँक ऑफ इंडिया व बाजार समिती यांच्यात करार झाला. बाजार समिती सभापती नवनाथ मस्के, बँक ऑफ इंडियाचे असिस्टंट जनरल मॅनेजर आर. पी. कुलकर्णी यांनी करारावर सह्या केल्या. अग्रणी जिल्हा प्रबंधक महेश हर्णे, प्रबंधक संदीप पाटील, सौरभ देशमुख, बँक व्यवस्थापक हिमांशू भारद्वाज, त्रिशूल देसाई, माजी सभापती रवींद्र पाटील, अजित जाधव, संचालक कुमार शेटे, सचिव चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक सचिव चंद्रकांत कणसे, नौशाद मोमीन, ओंकार सूर्यवंशी उपस्थित होते.  

   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com