‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३० कोटींचा आराखडा मंजूर

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३२७ गावच्या १३०.८८ कोटींच्या मृद्‍ व जलसंधारण प्राथमिक अंदाजपत्रीय आराखड्यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी (ता. १७) मंजुरी दिली.
‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३० कोटींचा आराखडा मंजूर
130 crore plan approved for 327 villages under 'Pokra'

औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३२७ गावच्या १३०.८८ कोटींच्या मृद्‍ व जलसंधारण प्राथमिक अंदाजपत्रीय आराखड्यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी (ता. १७) मंजुरी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजनेसंदर्भात जिल्हा संनियंत्रण समितीची आढावा बैठक पार पडली. 

या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. आर. देशमुख, जिल्हा पशुसंर्वधन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड आदींसह कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ३२७ गावांमध्ये औरंगाबाद तालुक्यातील ४५, पैठण ५३, फुलंब्री २४, वैजापूर ५४, गंगापूर ३५, खुलताबाद ११, सिल्लोड ३०, सोयगाव २२ आणि कन्नड तालुक्यातील ५३ गावांचा समावेश आहे. कृषी विभाग आणि ग्रामसंजीवनी समितीच्या समन्वयाने जल व मृद्‍संधारणातील कामांबाबतचे आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. जल व मृद्‍संधारण कामांमध्ये सिमेंट नालाबांध, कंपोजिट गॅबियन, कंपार्टमेंट बंडिंग, नाला खोलीकरण, अनघड दगडी बांध, समतल चर, माती नाला बांध आदी कामांचा समावेश असल्याचे डॉ. मोटे यांनी जिल्हाधिकारी यांना या वेळी माहिती दिली. पोकरा योजनेअंतर्गत सिल्लोड, वैजापूर आणि औरंगाबादच्या उपविभागनिहाय लाभांबाबतची सद्यःस्थितीची माहिती सादर करण्यात आली. यामध्ये वैयक्तिक लाभाचे घटक, तालुकानिहाय वितरित अनुदान, कृषी विकास घटकाचा प्रगती अहवाल, सूक्ष्म नियोजन प्रक्रिया आदींचाही समावेश होता. 

ती यादी चुकीची ः डॉ. मोटे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांमध्ये (पोकरा) १ हजार १७५ नवीन गावांचा समावेश झाल्याची यादी सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यामुळे या यादीच्या सत्यतेबाबत कृषी विभागाकडे सतत विचारणा होत आहे. समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत असलेली संबंधित यादी चुकीची आहे. त्यावर विश्‍वास ठेवू नये. पोकरामध्ये नव्याने कोणत्याही गावांची निवड झालेली नाही. जिल्ह्यात पूर्वी निवडलेल्या ४०६ गावांमध्ये कोणतीही भर पडली नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी कळविले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.