मराठवाड्यात २१३ प्रकल्प कोरडे

मराठवाड्यात २१३ प्रकल्प कोरडे
मराठवाड्यात २१३ प्रकल्प कोरडे

औरंगाबाद : यंदा मराठवाड्याला भीषण पाणीसंकटाला तोंड द्यावे लागणार हे पाणीसाठ्याच्या अवस्थेवरून स्पष्ट होत आहे. ४ जानेवारीअखेर मराठवाड्यातील ८७२ प्रकल्पांत केवळ १५ टक्‍केच उपयुक्‍त पाणी शिल्लक होते. २१३ लघु व मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले, तर ३०१ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेल्याचे चित्र आहे. गत काही वर्षातील भीषण जलसंकटाच्या दिशेने मराठवाड्याची वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी २४ प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर २२ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आला आहे. कोरड्या पडलेल्या मध्यम प्रकल्पांमध्ये औरंगाबादमधील ६, जालन्यातील ३, बीडमधील ८, उस्मानाबादमधील ७ प्रकल्पांचा समावेश आहे. जोत्याखाली आलेल्या मध्यम प्रकल्पांमध्ये औरंगाबादमधील ७, जालनामधील २,लातूरमधील ३, बीड ४, उस्मानाबादमधील ५, परभणीतील एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे.

७४९ लघु प्रकल्पांपैकी १८९ लघु प्रकल्प कोरडेठाक पडले असून २७९ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आला आहे. कोरड्या पडलेल्या लघु प्रकल्पांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ३६, जालना ३०, बीड ५५, लातूर १०, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ५८ प्रकल्पांचा समावेश आहे. जोत्याखाली पाणी गेलेल्या लघु प्रकल्पांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २७, जालना २०, बीड ५४, लातूर ७१, उस्मानाबाद ८८, नांदेड १६, तर परभणी जिल्ह्यातील ३ प्रकल्पांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांपैकी १३ प्रकल्पांत,जालना जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांपैकी ५ मध्यम प्रकल्पांत, बीडमधील १६ पैकी १२ मध्यम प्रकल्पांत, लातूरमधील ८ पैकी ३ प्रकल्पांत, उस्मानाबादमधील १७ पैकी ८ मध्यम प्रकल्पात उपयुक्‍त पाणी नाही. परभणीमधील १ व नांदेड जिल्ह्यातील २ प्रकल्पात उपयुक्‍त पाण्याचा थेंब नसल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सुत्रांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com