ठिबकसाठी केंद्राकडून २९० कोटी

ठिबक अनुदान
ठिबक अनुदान

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक अनुदान वाटप करण्यासाठी केंद्राने यंदा २९० कोटी रुपये मंजूर केले आहेत. कृषीसंबंधित कोणत्याही योजनेच्या अनुदानासाठी एरवी सतत प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना ठिबकबाबत मात्र दिलासा मिळतो आहे. ‘ठिबकसाठी भरपूर अनुदान आणि अर्ज कमी,’ अशी स्थिती तयार झालेली आहे.   राज्यासाठी गेल्या हंगामात ठिबकसाठी एकूण ५७० कोटी रुपये उपलब्ध होते. पावणेदोन लाख अर्ज आल्यानंतर त्यातील बहुतेक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. सध्या २० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  “राज्य शासनाने यंदा तयार केलेल्या ठिबक आराखड्यात केंद्राकडे ४८० कोटी रुपयांची मागणी केली आहे. अर्थात ही मागणी केंद्राकडे पोचण्यापूर्वीच २९० कोटींचा पहिला हप्ता केंद्राने मंजूर केला आहे. त्यामुळे निधीची अजिबात टंचाई नाही,” अशी माहिती सूत्रांनी दिली.  ठिबक अनुदानासाठी केंद्राकडून ६० टक्के; तर राज्य शासनाच्या तिजोरीतून ४० टक्के निधी दिला जातो. यंदा राज्याचा १९३ कोटींचा हिस्सा विचारात घेता शेतकऱ्यांना वाटण्यासाठी एकूण ४८३ कोटी रुपये उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नव्याने मागविल्या जाणाऱ्या सर्व पात्र अर्जांना अनुदान मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. शेतकरी आपला अर्ज भरण्यासाठी http://mahaethibak.gov.in/preinstall/frm_ben_uid_add.php या संकेतस्थळाची मदत घेत आहेत. अर्ज करण्याची सुविधा यंदा एक जूनपासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत २५ हजार अर्ज अपलोड झालेले आहेत. त्यात जळगाव ५०००, बुलडाणा ३०००, औरंगाबाद ३०००; तर जालना जिल्ह्यातून २००० अर्ज अपलोड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शेतकऱ्याने केलेला ऑनलाइन अर्ज पुढे तालुका कृषी अधिकाऱ्याकडे पूर्वसंमतीसाठी जाणार आहेत. पूर्वसंमती मिळताच ३० दिवसांत कोणत्याही कंपनीकडून ठिबक संच बसविण्याची संधी शेतकऱ्याला मिळते. अर्थात, संच बसविल्याची पावती व अनुदान मागणीचा प्रस्ताव शेतकऱ्याला पुन्हा ३० दिवसांच्या आतच ऑनलाइन सादर करावा लागतो. तसे न केल्यास पूर्वसंमती पत्र आपोआप रद्द होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com