वर्धा जिल्ह्यात ४७ टक्के पीक कर्जवाटप

वर्धा जिल्ह्यात ४७ टक्के पीक कर्जवाटप
वर्धा जिल्ह्यात ४७ टक्के पीक कर्जवाटप

वर्धा : शेतीच्या उत्पादन खर्चात सातत्याने झालेली वाढ, शेतमालाला बाजारात मिळणारे अल्प दर आणि अस्मानी संकटामुळे शेतीचा व्यवसाय बेभरवशाचा झाला आहे. शेती उभी करण्यासाठी शेतकऱ्यांना पीककर्जाचा आधार घ्यावा लागतो; मात्र, याही वर्षी शासनाकडून जिल्ह्याला मिळालेल्या पीककर्जाची टक्केवारी पन्नाशीच्या आतच रखडली आहे.  

खरीप हंगामात अर्ज केल्यानंतरही पीककर्ज न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ५० ते ५२ टक्के राहिली. ज्यांची प्रकरणे प्रलंबित होती, त्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात तरी पीककर्ज मिळेल, अशी आशा होती; मात्र त्यांच्यापैकी अवघ्या १० ते १५ टक्के शेतकऱ्यांनाच रब्बी हंगामाच्या काळात पीककर्ज मंजूर झाले. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने पीककर्ज उपलब्ध होईल, अशी हमी राज्य शासनाने दिली. मात्र, प्रत्यक्षात हे आश्‍वासन फोल ठरले.

शासकीय यंत्रणेच्या माध्यमांतून विविध बॅंकांच्या प्रत्येक शाखेसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. कागदपत्रांची मदत करणे, शाखा व्यवस्थापक आणि बॅंकांच्या बड्या अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात राहून पीककर्जाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आला. बॅंकांनी मिळालेल्या उद्दिष्टाच्या ४८ ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत तरी पीक कर्जवाटप केले; अन्यथा हा आकडा २५-३० टक्‍क्‍यांच्या वर गेला नसता, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीपासून बॅंक अधिकारी, संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी आदींच्या वारंवार बैठका घेण्यात आल्या. बॅंकांना कारवाईचा बडगा उगारला जाईल, असेही बजावण्यात आले; मात्र, बॅंकिंग क्षेत्र आधीच अडचणीत असल्यामुळे परत न येणाऱ्या कर्जाचे वाटप करणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे होय, अशी बॅंकिंग क्षेत्राची धारणा झाली. यातून शेतकऱ्यांना विविध नियम, अटी व कागदपत्रांच्या जंजाळात अडकवून कर्ज नाकारण्यात आले. 

साखळी खंडित  बॅंकेचे कर्ज मंजूर झाल्यावर बाहेरून घेतलेले कर्ज परत करता येईल, या आशेवर शेतकरी असतात. परंतु, याहीवर्षी अनेक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे कर्ज घेणे आणि फेडण्याची साखळी खंडित झाली. 

बॅंकांची दारे बंद  कर्जमाफीसाठी पात्र ७७ हजार ७५१ शेतकऱ्यांना ४४८ कोटी ५५ हजार रुपयांचा लाभ मिळणार होता. प्रत्यक्षात १५ हजार ३५६ शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळाली. एकूण शेतकऱ्यांपैकी ६२ हजार ३९५ (८० टक्के) शेतकरी कर्जमाफीपासून दूरच आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांची बॅंकांमध्ये `डिफॉल्टर'' अशी नोंद कायम आहे. परिणामी, या शेतकऱ्यांना बॅंकांतून कर्ज मिळण्याची दारे बंद झाली आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com