
नगर : नगर जिल्हा वार्षिक योजनेत २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी नगर जिल्ह्यासाठी ५४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय बैठकीत जाहीर केले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे मुंबई येथून राज्यस्तरीय बैठकीत जिल्ह्याच्या २०२२-२३ वार्षिक योजनेचा आढावा घेतला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे सहभागी झाले होते.
नगर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, आमदार डॉ. किरण लहामटे, नाशिक येथून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, अधिक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे आदी अधिकारी सहभागी झाले होते.
जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ करीता शासन निर्धारित नियतव्यय ४५३.४० कोटी रुपये मर्यादेच्या तुलनेत ८६.६० कोटी रुपये वाढीसह ५४० कोटी रुपये तरतूद निश्चित करण्यास त्यांनी यावेळी मान्यता दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीला २०२२-२३ या वर्षासाठी आवश्यक असलेल्या निधींच्या कामांचे सादरीकरण केले.
दहा वर्षांपासून सातत्याने वाढ दहा वर्षांपूर्वी जिल्हा नियोजनला १२५ कोटी रुपये देण्यात आले होते. यात सातत्याने वाढ करण्यात येऊन निधी वितरित करण्यात येत आहे. २०२१-२२ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेमध्ये ५१० कोटींची तरतूद करण्यात आली होती. जिल्हा नियोजन आराखड्यानुसार सन २०२२-२३ मध्ये जिल्ह्यासाठी ४५३.४० कोटींचा नियतव्यय शासनाने कळविला होता. मात्र लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाच्या वाढीव निधीची मागणी विचारात घेता जिल्ह्याला ५४० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.