काजूला हमीभाव देण्याबाबत  प्रयत्न करणार ः भुसे 

कोकणातील काजू बागायतदारांना हमीभाव देण्याबाबत व वाईन उत्पादनाबाबत निकष बदलण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
 काजूला हमीभाव देण्याबाबत  प्रयत्न करणार ः भुसे 
About guaranteeing cashews Will try: straw

दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील काजू बागायतदारांना हमीभाव देण्याबाबत व वाईन उत्पादनाबाबत निकष बदलण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.  दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री भुसे यांची शेतकऱ्यांनी भेट घेऊन विविध मुद्यांवर चर्चा केली. येथे प्रक्रिया उद्योग नसल्याने कोकणातील काजूची बोंडे, फणस आदीपासून कुटीरोद्योग स्वरूपात वाइन तयार करून ती विक्री करणे शक्य आहे. सध्या दापोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असून, त्यांनाही ही वाइन कमी किमतीत मिळेल. त्यातून रोजगार तयार होऊन रोजगारासाठी बाहेर जावे लागणार नाही, सरकारने या संदर्भात सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली.  कोकणात होणारा फणस, काळा भात, नाचणी, सध्या दुर्लक्षित आहेत. त्यांचे पुनरुज्जीवन करणार आहे. कोकणात आंबा व भात ही दोन प्रमुख पिके घेण्यात येतात. मात्र भातानंतर दुबार पीक घेण्याबाबत उपाययोजना करण्यात यावी, असे आपण येथील स्थानिक कृषी विभागाला सांगितले आहे. दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी दापोली विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली आहे. कोकणात हळदीचा प्रयोग यशस्वी झाला तर त्याला शासकीय पाठबळ देण्यात येईल. कृषी पर्यटनातून कोकणात मोठी संधी उपलब्ध आहे. त्यामुळे कृषी पर्यटनावर भर देण्यात येईल, या बाबतच्या सूचना आपण कृषी विभागाला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मे महिन्यात होणारा सुवर्ण पालवी उपक्रम कोणत्याही प्रायोजका विना राबवण्याची भुसे यांनी घोषणा केली. या उपक्रमाला लागणारा सर्व खर्च शासन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चिपळूण येथे आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणच्या शेती नापीक झाल्या आहेत. या नापीक झालेल्या शेतीबाबत काय उपाययोजन करण्यात येतील, याचा कृषी विभाग अभ्यास करणार असल्याचे ते म्हणाले.  विद्यापीठातील रोजंदारीचा प्रश्‍न हा केवळ एका विद्यापीठापुरता मर्यादित नाही. तो राज्यव्यापी प्रश्‍न आहे. त्यामुळे या बाबत राज्याचा जो निर्णय होईल तो निर्णय येथे राबवण्यात येईल. शिवाय विद्यापीठ कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम बंद करणार नाही. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे भविष्यात नुकसान होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी आमदार योगेश कदम, कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्यासह विद्यापीठातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.