पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?

जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपण्यास दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, अद्यापही गट व गणांच्या पुनर्रचना प्रक्रिया खोळंबल्याने मुदतीत निवडणुका होतील की नाही याबाबत साशंकता आहे.
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?
Administrator on Pune Zilla Parishad?

पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपण्यास दीड महिन्याचा  कालावधी शिल्लक आहे. मात्र, अद्यापही गट व गणांच्या पुनर्रचना प्रक्रिया खोळंबल्याने मुदतीत निवडणुका होतील की नाही याबाबत साशंकता आहे. तर राज्यासह जिल्ह्यात ओमिक्रॉनचे देखील संकट वाढत असून, जिल्हा प्रशासनाने घालतेल्या निर्बंधामुळे देखील मतदान होणे अवघड आहे. यामुळे निवडणुका वेळेत न झाल्यास जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांवर प्रशासन नियुक्ती होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर नुकत्याच मुदत संपलेल्या जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील तरतुदीनुसार मुदत संपण्याच्या किमान १५ दिवस आधी नवीन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण होणे अनिवार्य आहे. यासाठी मुदतीच्या अखेरचे दोन आठवडे सोडून, त्याआधी किमान ४५ दिवस आधी पंचावार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणे अनिवार्य आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी किमान सहा महिने गट व गणांची पुनर्रचना अंतिम होणे आणि त्यानंतर गट व गणनिहाय आरक्षण सोडत काढणे आवश्‍यक असते. यापैकी एकही प्रक्रिया अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. 

दरम्यान, याआधी पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समित्यांच्या गणांचा कच्चा आराखडा तयार करून तो ३० नोव्‍हेंबर २०२१ पर्यंत सादर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या मुदतीत गट व गणांचा कच्चा आराखडा तयार केला. परंतु, तो सादर करता आलेला नाही. 

पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकारी व सदस्यांची पाच वर्षाची मुदत येत्या २१ मार्च २०२२ रोजी संपणार आहे. तर पुणे जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांचा कार्यकाळ १३ मार्च २०२२ ला संपला आहे. त्याआधी किमान १५ दिवस पूर्वनियोजनानुसार ही निवड प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, या तारखेपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कमाल १२ जानेवारी २०२२ पर्यंत या निवडणुकीची आचारसंहिता लागू होणे आवश्‍यक होते. परंतु, अद्याप गट, गण रचना व त्यांची आरक्षण सोडत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. या प्रक्रियेसाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नियोजित मुदतीत निवडणूक होणे अशक्य असल्याने प्रशासकीय राजवटीची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com