अडगाव बुद्रुक येथे केली एचटीबीटी बियाणे लागवड

सरकारच्या नियमानुसार एचटीबीटी लागवड करणे हा जर गुन्हा असेल तर तो आम्हाला मान्य आहे. सरकार दुसऱ्या कुठल्याही तंत्रज्ञानाला बंधन घालत नाही; मात्र शेतकऱ्यांच्या फायद्याच्या तंत्रज्ञानावर बंदी घातली जाते. हा अन्याय आहे. जोपर्यंत सरकार अशी आधुनिक बियाणे रास्तपणे उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत शेतकरी संघटनेचे हे आंदोलन सुरू राहील. यापुढील टप्प्यात आम्ही शेतकरी या तंत्रज्ञानाच्या स्वतः चाचण्या घेणार आहोत. साधा कापूस, बीटी कापूस आणि एचटीबीटी असा तीन प्रकारचा कापूस लागवड करून कुठल्या कपाशीवर कीड, रोग आला, कुठला कापूस फायदेशीर ठरला याचा डाटा आम्ही गोळा करू. त्याबाबतचा सविस्तर अहवाल सरकारला देऊ. - अनिल घनवट, प्रदेशाध्यक्ष, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना
एचटीबीटी बियाण्याची लागवड करताना कार्यकर्ते
एचटीबीटी बियाण्याची लागवड करताना कार्यकर्ते

अकोला : अडगाव बुद्रुक (ता. तेल्हारा) येथे सोमवारी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने एचटीबीटी बियाण्याची लागवड करण्यात आली.  

जिल्ह्यात १० जूनला शेतकरी संघटनेकडून अकोली जहाँगीर येथे सविनय कायदेभंग करीत तंत्रज्ञान स्वातंत्र्य भंडारा घेण्यात आला होता. प्रतिबंधित असलेले एचटीबीटी बियाणे लावण्यात आले. त्यानंतर सोमवारी अडगाव बुद्रुक येथे याच आंदोलनाचा पुढील टप्पा झाला. या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, सीमाताई नरोडे, ललित बहाळे, अनिल चव्हाण, सतीश देशमुख, लक्ष्मीकांत कौठकार, राजाभाऊ कुजदेकर, माया कुजदेकर, प्रमिलाताई भारसाकळे, प्रफुल्ल बदरखे, नीलेश नेमाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. 

देशात शासनाने मागील नऊ वर्षांपासून जीएम तंत्रज्ञानाच्या चाचण्या बंद केल्या आहेत. ही बंदी तातडीने उठविण्यात यावी, शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, बियाणे मिळावे अशी मागणी शेतकरी संघटनेने लावून धरली आहे. या आंदोलनात अकोट व तेल्हारा तालुक्यांतील शेतकरी एकत्र आले होते. श्री. कौठकर यांच्या शेतात ही बियाणे लागवड करण्यात आली. तत्पूर्वी झालेल्या सभेत श्री. घनवट, श्री. बहाळे, सीमा नरोडे यांच्यासह इतरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

सरकार तंत्रज्ञानाच्या बाबतीत शेतकऱ्यांवर कसा अन्याय करीत आहे, याची मांडणी वक्त्यांनी आपल्या भाषणातून केली. या आंदोलनाच्या अनुषंगाने कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कृषी विभागाचे पथकही याठिकाणी दाखल झालेले होते. सायंकाळपर्यंत कोणताही गुन्हा याप्रकरणात दाखल झालेला नव्हता.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com