कृषी सीईटीचा ‘सार’ प्रयोग फसला

कृषी सीईटीचा ‘सार’ प्रयोग फसला
कृषी सीईटीचा ‘सार’ प्रयोग फसला

पुणे:  कृषी पदवी सीईटीसाठी विद्यार्थी नोंदणीसाठी ‘सेतू असिस्टंट ॲडमिशन रजिस्टर’ (सार) पोर्टलचा वापर करण्याचा पहिलाच प्रयोग फसला आहे. राज्य सामाईक प्रवेश कक्षाच्या अखत्यारित ऑनलाइन नोंदणी सपशेल कोलमडून पडली. त्यामुळे प्रवेशाची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच आता कृषी परिषदेकडे देण्यात आली आहे.  विद्यार्थ्यांची गैरसोय ‘सार’ पोर्टलमुळे नोंदणीसाठी होणार नाही, असे सीईटी कक्षाने आधी घोषित केले होते. १३८ कृषी महाविद्यालयांमधील १४ हजार ५७७ जागांचे प्रवेश यंदा सर्वंकष अशा सामाईक प्रवेश परीक्षेतूनच (सीईटी) घेण्याचे जाहीर करीत सीईटीने विद्यार्थ्यांना www.mahacet.org या संकेतस्थळावर नोंदणीची सक्ती केली होती.   नोंदणी प्रक्रिया प्रत्यक्षात ‘सार’वर सुरू होताच विद्यार्थी हैराण झाले. कामकाजाचा अंदाज न घेतल्यामुळे सर्व्हरवर अफाट ताण पडला. राज्यभर नोंदणीचा गोंधळ झाल्यामुळे सीईटीने यातून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न सुरू केला. शेवटी सीईटीच्या संकेतस्थळाऐवजी परिषदेच्याच आधीच्या www.maha-agriadmission.in या संकेतस्थळावरून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना हकनाक मनस्ताप झाला आहे. परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर म्हणाले, की प्रवेश प्रक्रिया परिषदेकडे देण्यात आली असली तरी त्यावर नियंत्रण सीईटीचेच आहे. विद्यार्थ्यांनी नोंदणी व कागदपत्रांचे स्कॅन प्रतिंचे अपलोडिंग १० जुलैपर्यंत संकेतस्थळावर करता येणार आहे. याच ठिकाणी विकल्प भरण्याची देखील सुविधा आहे. महाविद्यालयांचा दर्जा आणि शुल्क पाहून विकल्प भरणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांचे सीईटीमधील गुण, प्रवर्ग, विकल्प या बाबी तपासून जागा वाटप केले जाणार आहे. याशिवाय सातबाराचे १२ गुण व  कृषी संबंधित वैकल्पिक विषयांचे १० गुण तसेच इतर अधिभारदेखील विचारात घेतले जाणार आहे. मात्र, हे गुण कमाल २० असतील. प्रवेशाच्या चार फेऱ्या यंदा होतील. स्पॉट अॅडमिशनसाठी रिक्त जागांची यादी २४ ऑगस्टला जाहीर होईल. त्यावरील प्रवेश २६ ते २९ ऑगस्ट दरम्यान होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com