मका बियाण्यांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई : कृषिमंत्री डॉ. बोंडे

कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे
कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे

नाशिक  : लष्करी अळीचा प्रतिबंध करण्यासाठी मका बियाणे‘डबल कोटिंग’च्या नावाखाली अव्वाच्या सव्वा दरात विकून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, इशारा कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिला. 

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता. १) जिल्हा परिषदेतील रावसाहेब सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, विभागीय आयुक्त राजाराम माने, कृषी आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, अर्थ व बांधकाम समिती सभापती मनीषा पवार, कृषी सहसंचालक रमेश भताने, जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ आदी उपस्थित होते.

श्री. बोंडे म्हणाले, की पीककर्ज वितरणात ज्या बँका कुचराई करतील त्यांच्यावर तसेच बियाणे व खतांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांनी देखील शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विमा योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीस माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच कृषी विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या कृषी योजनांच्या पुस्तकाचे व घडीपत्रकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे उदघाटन करण्यात आले. 

या वेळी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत सुमन माधव कुऱ्हाडे (ता. सिन्नर) यांना दोन लाख रुपये आरटीजीएसद्वारे देण्यात आल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच ६९ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

‘माझ्याकडे थेट तक्रार करा, त्यांना तुरुंगात पाठवू’ राज्यात ठिकठिकाणी पावसाचे आगमन झाले आहे. बियाणे, खते, कीटकनाशके मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यांचा तुटवडा जाणवू देणार नाही. मात्र कृषीनिविष्ठा विक्रीत काहीही अडचणी आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, तसेच याबाबत ९४२२१५६३३६ या क्रमांकावर आपली तक्रार पाठवावी. तक्रारदाराचे नाव गुप्त ठवून संबंधितांवर कारवाई करून थेट तुरुंगात पाठविण्यात येईल, अशी तंबी श्री. बोंडे यांनी दिली. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com