शेतमाल निर्यात खर्च झाला दुप्पट 

लंडनमध्ये डिसेंबरअखेर कोरोनाचा नव्या स्ट्रेन आढळून आल्याने हवाई वाहतूक सेवा प्रभावित झाली. हवाई वाहतूक फेऱ्या कमी झाल्याने निर्यात करण्यासाठी येणारा वाहतूक खर्च दुपटीने वाढला आहे.
plane
plane

नाशिक : लंडनमध्ये डिसेंबरअखेर कोरोनाचा नव्या स्ट्रेन आढळून आल्याने हवाई वाहतूक सेवा प्रभावित झाली. हवाई वाहतूक फेऱ्या कमी झाल्याने निर्यात करण्यासाठी येणारा वाहतूक खर्च दुपटीने वाढला आहे. परिणामी, नाशिकमधून होणारी शेतीमाल निर्यात ७० टक्क्यांनी घटली आहे. तर त्याचा मोठा परिणाम कामकाजावर झाल्याने निर्यातदार व शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

लंडनमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळून आल्याने हवाई वाहतूक फेऱ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे सुरू असलेल्या काही विमानांसाठी हवाई वाहतुकीचे दर निर्यातदारांना परवडणारे नाहीत. परिणामी, निर्यातदारांनी कामकाज कमी केल्याने सरासरी होणारी निर्यात अवघी ३० टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे माल निर्यात होत नसल्याने पिकविलेला निर्यातक्षम शेतमाल स्थानिक बाजारात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

युरोपियन देशांच्या मानकाप्रमाणे रासायनिक अवशेषमुक्त शेतीमाल जिल्ह्यातील शेतकरी पिकवीत आहेत. या अनुषंगाने शेतकऱ्यांशी निर्यातदारांना करारही केले आहेत. काढणीपश्‍चात शेतीमालाची हाताळणी प्रतवारी व पॅकिंग ही कामे भारत सरकारच्या ओझर मिग (ता. निफाड) येथील हॉलकॉन सुविधा केंद्रावरून होते. नंतर मुंबईवरून हवाईमार्गे शेतीमाल लंडन बाजारात जातो. या सुविधा केंद्रावरून दररोज ९० टक्के नाशवंत शेतीमाल निर्यात होतो; मात्र हवाई वाहतूक सेवा बंद झाल्याचा हा मोठा परिणाम आहे. 

काही महिन्यांपूर्वी कामकाज सुरळीत झाल्यानंतर आता पुन्हा नव्या स्ट्रेनमुळे सर्वच कामकाज विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता प्रवासी वाहतूक विमानांमधून शेतीमाल पाठविण्याची वेळ आली आहे. मात्र दर अधिक असल्याने निर्यातीचे कामकाज कोलमडल्याचे चित्र आहे.  वाहतूक दराची स्थिती  टाळेबंदीपूर्वी प्रतिकिलोला ११० ते १२५ रुपये वाहतुकीचा दर होता. मात्र त्यानंतर हवाई वाहतूक मंदावल्याने सुरू असलेल्या काही विमानांमधून २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो दरम्यान दर द्यावा लागत आहे. त्यामुळे दैनंदिन सरासरी १२ टनांपर्यंत होणारी निर्यात अवघ्या २ टनांवर आल्याची माहिती सुविधा केंद्रातील सूत्रांनी दिली. परिणामी चालू महिन्यात २५० टनांवर निर्यात घटली आहे.  या शेतीमालाला फटका  भेंडी, दुधी भोपळा, हिरवी मिरची, वालपापडी, ढेमसे, सुरण, चिकू, शेवगा    गत चार वर्षांतील निर्यातीची स्थिती :  वर्ष : निर्यात(टन)  २०१७ : ४०००  २०१८ : ३,८००  २०१९ : २०००  २०२० : १०००  प्रतिक्रिया  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हवाई फेऱ्यांची संख्या घटली. परिणामी, काही विमान कंपन्यांनी माल वाहतूक सुरू ठेवली. मात्र त्यांचे दर वाढल्याने निर्यात खर्च परवडणारे नाही. निर्यातक्षम भाजीपाला या ठिकाणी येतो. मात्र हवाई वाहतूक महागल्याने कामकाज अडचणीत आले आहे. पर्यायी जहाज वाहतूक अधिक काळ घेत असल्याने नाशवंत मालासाठी ती सुलभ नाही. त्यामुळे फटका मोठा आहे.  - सुधाकर सेन, मुख्य कार्यकारी अधिकारी-हॉलकॉन, ओझर मिग, नाशिक  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com