‘ॲग्रोवन’ बनला शेतकऱ्यांचा भक्कम आधार : साखर आयुक्त शेखर गायकवाड

माध्यमांच्या गर्दीत भांबावलेला सामान्य शेतकरी आजही योग्य माहितीपासून वंचित आहे. अशा स्थितीत शेतीचे अर्थकारण, नवतंत्रज्ञानासाठी शेतकऱ्यांना साक्षर करणारा ‘अॅग्रोवन’ हा एक भक्कम आधार बनला आहे.
calender
calender

पुणे : ‘‘माध्यमांच्या गर्दीत भांबावलेला सामान्य शेतकरी आजही योग्य माहितीपासून वंचित आहे. अशा स्थितीत शेतीचे अर्थकारण, नवतंत्रज्ञानासाठी शेतकऱ्यांना साक्षर करणारा ‘अॅग्रोवन’ हा एक भक्कम आधार बनला आहे,’’ असे गौरवपूर्ण प्रतिपादन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.  कृषिविषयक माहितीचा खजिना असलेल्या ‘ॲग्रोवन''च्या सन २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन औपचारिकपणे करताना ते बोलत होते. या वेळी ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण उपस्थित होते. ‘‘ज्ञानाची क्षेत्रे विस्तारत असून डिजिटल माध्यमातून प्रचंड माहिती वाहते आहे. मात्र यात सामान्य शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारी किंवा शेतकऱ्यांच्या नव्या पिढीला शेतीचे नवतंत्र व आधुनिक शास्त्राची सोप्या पद्धतीने माहिती देण्याचा मोठा अभाव दिसतो आहे. अशा वेळी मला फक्त ‘अॅग्रोवन’ हाच एकमेव उपयुक्त स्रोत शेतकऱ्यांसाठी दिसतो आहे,’’ असे श्री. गायकवाड म्हणाले. कृषी विस्ताराच्या कक्षा वाढवायला हव्यात, असा आग्रह त्यांनी धरला. ते म्हणाले,  की राज्यात कृषिविषयक कामांसाठी २५-३० हजार कर्मचारी वर्ग असून, त्यामार्फत योजना मात्र सहा लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात. या उलट साखर क्षेत्रातील कामांचे फायदे थेट ३० लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत. शास्त्रज्ञांना आता तक्ते आणि किचकट माहितीतून बाहेर पडून सोप्या सुटसुटीत भाषेत शेतकऱ्यांपर्यंत फायदेशीर माहिती न्यावी लागेल. आधुनिक साधनांमुळे प्रचंड डेटा तयार होत आहे. मात्र तो देखील शेतकऱ्यांना कसा उपयोगाचा होईल याविषयी सखोल काम करावे लागेल, अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली.  श्री. चव्हाण यांनी ‘अॅग्रोवन’च्या उपक्रमांविषयी माहिती दिली. ‘‘लॉकडाउनच्या कालावधीत शेतीत खंबीरपणे उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या ‘अग्रोवन’ने मांडल्या. त्याच्यात सकारात्मकता पेरण्याचे काम सातत्याने केले. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे संघर्ष आणि आंदोलनांचे प्रतिबिंब देखील ‘अॅग्रोवन’मधून उमटले,’’ असे त्यांनी नमूद केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘अॅग्रोवन’चे मुख्य उपसंपादक अमित गद्रे यांनी, तर आभार मुख्य व्यवस्थापक बाळासाहेब खवले यांनी मानले.

आधी समाजाला काय हवे ते तपासा... ग्रामविकास आणि कृषी विकासविषयक अनेक उपक्रम राबविण्याची भरपूर संधी आहे. मात्र ही कामे करताना समाजाला नेमके काय हवे आणि केलेल्या उपक्रमाचे पडसाद काय उमटतील ते तपासून कामे करायला हवीत, असे मत साखर आयुक्तांनी व्यक्त केले. ‘‘एका जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी एका सामाजिक संस्थेने गावातील प्रत्येक घराची मालकी पत्नीच्या नावे करण्यासाठी अभियान राबविले. अपेक्षेप्रमाणे गावातील महिलांच्या नावे त्यांचे घर झाले देखील. मात्र व्यसनाधीन पतीराजांनी घरपट्टी किंवा इतर कर भरण्यास नकार देत ती जबाबदारी मालकीणबाईंवर ढकलण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच सामाजिक सुधारणा सुचविताना परिणामाचे भान राखायला हवे,’’ असे आयुक्त म्हणाले.

दिनदर्शिकेचे आज राज्यभर वितरण ‘अॅग्रोवन’च्या आजच्या (ता. २५) अंकासोबतच वार्षिक दिनदर्शिका राज्यभर वाचकांच्या भेटीला येत आहे. कृषिसल्ला, पर्जन्यविचार, शेतीविषयक मुहूर्त आणि विविध विषयांची मेजवानी या दिनदर्शिकेत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com