आळंदीत आजपासून ग्रामविकासावर मंथन

आळंदीत आजपासून ग्रामविकासावर मंथन
आळंदीत आजपासून ग्रामविकासावर मंथन

पुणे : सकाळ ॲग्रोवनच्या सातव्या सरपंच महापरिषदेला आळंदीत आजपासून (ता. १५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत प्रारंभ होत आहे. राज्यातील निवडक एक हजार सरपंचांचा सहभाग असलेल्या या महापरिषदेचे उद्‌घाटन सकाळी ११ वाजता होईल. दरम्यान, बुधवारी दुपारपासूनच महापरिषदेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील सरपंच दाखल व्हायला सुरवात झाली असून ज्ञानोबारायांची आळंदी गजबजून गेली आहे. महाराष्ट्राचा कृषिविकास आणि ग्रामसमृद्धीसाठी धोरणात्मक मंथन घडवून आणणारी एक ऐतिहासिक चळवळ म्हणून सरपंच महापरिषदेचा आवर्जून उल्लेख केला जातो. आजपासून सुरू होत असलेल्या सातव्या महापरिषदेत महिला सरपंचांसह एक हजारांहून अधिक सरपंच सहभागी होत आहेत.  आळंदीमधील माउली समाधी मंदिराजवळच्या फ्रुटवाले धर्मशाळा सभागृहात गुरुवारी सकाळी ११ वाजता महापरिषदेला सुरवात होईल. महापरिषदेचे मुख्य प्रायोजक फोर्स मोटर्स हे असून स्मार्टकेम टेक्‍नॉलॉजिज लिमिटेड, विक्रम चहा हे प्रायोजक आहेत. राज्य शासनचा जलसंधारण विभाग, रोजगार हमी विभाग, पशुसंवर्धन विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान यांचा सहयोग सरपंच महापरिषदेला लाभला आहे. ग्रामविकासाची स्वप्नं बघणारे सुशिक्षित, गावासाठी उत्साहाने पुढाकार घेणारे युवा सरपंच, तसेच आपल्या अनुभवातून गावात आदर्श कामे करणाऱ्या अनुभवी सरपंचांचा परिषदेत समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अनेक महिला सरपंच या महापरिषदेत उत्साहाने सहभागी होत आहेत. 

मान्यवरांचे मार्गदर्शन मिळणार  -  आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष तथा हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्याकडून सरपंच मंडळींना विकासाचा मंत्र या महापरिषदेत मिळणार आहे. पंतप्रधान कार्यालयापासून ते जागतिक बॅंकेपर्यंत हिवरे बाजारातील प्रयोगांचे कौतुक होत असून त्यामागे श्री. पवार यांच्या रूपाने एका कुशल व दिशादर्शक सरपंचांची भूमिका मोलाची ठरली आहे. सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने श्री. पवार यांच्यासारखे धुरंधर सरपंच तयार करून राज्याच्या नकाशावर आणखी काही आदर्श ग्रामपंचायती साकारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

धोरण, प्राधान्यक्रम समजणार  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती सरपंच महापरिषदेत असेल. यामुळे सरकारकडून ग्रामविकासाचे पुढील धोरण समजण्यास मदत होणार आहे. गावाला विकासाच्या वाटेने नेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सरपंचांना यामुळे सरकारचे प्राधान्यक्रम व भूमिका समजून घेता येईल. त्यातून गावात विकासाचे नियोजन करण्यास मदत होणार आहे. मृद व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे देखील शुक्रवारी परिषदेच्या समारोप सत्रात सहभागी होत आहेत. गावागावांमध्ये सुरू असलेल्या जलयुक्तशिवार अभियानाबाबत प्रा. शिंदे यांच्याकडून पुढील दिशा समजून घेण्यास सरपंचांना मदत मिळणार आहे. 

कृषिकेंद्रित ग्रामसमृद्धीचा मंत्र  सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने राज्यातील सरपंचांना खऱ्याखुऱ्या ‘भगिरथ’ मंडळींना भेटण्याची संधी मिळणार आहे. विविध गावांमध्ये विकासाची गंगा आणून राज्य व देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या या भगिरथांकडून सरपंचांना कृषिकेंद्रित ग्राम समृद्धीचा मंत्र मिळणार आहे. यात पोपटराव पवार यांच्यासह कुर्डू गावातील जयंतराव पाटील कुर्डूकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, महिन्यात गावाला दहा पुरस्कार मिळवून देणारे ॲड. विकास जाधव, विदर्भातील आपल्या कायापालट करणारे सरपंच चंदू पाटील, बारडगावचा सरपंच डॉ. शीतल गावडे, शेतकरी उत्पादक कंपन्यांची चळवळ उभारणारे विलास शिंदे, अंकुश पडवळे, योगेश थोरात यांच्याकडून दिशादर्शक माहिती सरपंचांसाठी दिली जाणार आहे. याशिवाय कृषी विभाग आणि गाव विकास, गटशेती, ग्रामविकास, आदर्श गाव योजना, ग्रामस्वच्छता, ग्रामपंचायत व ग्रामसभेचे अधिकार, चौदावा वित्त आयोग, सरपंचांचे हक्क आणि कर्तव्य अशा विविध विषयांवर महापरिषदेत चर्चा होईल.   ट्रॅक्टरसह अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी   सरपंच महापरिषदेत सहभागी झालेल्या सरपंचांना मौलिक मार्गदर्शनाबरोबरच विविध बक्षिसांचे मानकरी होण्याची संधी मिळणार आहे. महापरिषदेचे मुख्य प्रायोजक ‘फोर्स मोटर्स’ यांच्याकडून भाग्यवान सरपंचाला ऑर्चर्ड ट्रॅक्टर मिळणार आहे. त्यासाठी ड्रॉ काढला जाणार आहे. याशिवाय महापरिषदेचे दुसरे प्रायोजक असलेल्या विक्रम चहा यांच्या वतीने राज्यातील दहा गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी डिजिटल क्लासरूम दिले जाणार आहेत. प्रत्येक डिजिटल क्लासरूमसाठी ५५ हजार रुपयांचे साहित्य विक्रम चहाकडून दिले जाणार असून, या भाग्यवान गावांची नावेदेखील ड्रॉ पद्धतीने काढली जातील. उद्‌घाटन सत्राचे अॅग्रोवन आणि सकाळच्या फेसबुकवर थेट प्रक्षेपण, वेळ : सकाळी ११ वाजता https://www.facebook.com/AGROWON https://www.facebook.com/SakalNews 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com