पीकविमा भरपाईसाठी अकोलखेड मंडळ पात्र : कृषी आयुक्तालय

जिल्ह्यातील संत्रा पट्ट्यात कमी व अनियमित पाऊस झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या बागांमध्ये यंदाचा मृग बहर पुरेशा प्रमाणात फुटू शकलेला नाही.
crop insurance
crop insurance

अकोला ः जिल्ह्यातील संत्रा पट्ट्यात कमी व अनियमित पाऊस झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या बागांमध्ये यंदाचा मृग बहर पुरेशा प्रमाणात फुटू शकलेला नाही. दुसरीकडे पावसाच्या नोंदीमुळे शेतकरी फळपीकविम्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात, अशी भावना तयार झाली. यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालय गाठत पाऊस नोंदीबाबत तक्रार केली. याचे वृत्त ‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित झाले. यावर कृषी आयुक्तालयाने शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन वस्तुस्थितीला धरून नाही, असा दावा केला आहे. त्यानुसार अकोलखेड मंडळातील शेतकरी पीकविमा भरपाईसाठी पात्र ठरले आहेत. 

कृषी आयुक्तालयातील विस्तार व प्रशिक्षण संचालकांच्या नावे दिलेल्या पत्रात म्हटले, की पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मृग बहार सन २०२१ मध्ये संत्रा पिकासाठी अकोट तालुक्यातील अकोट, उमरा, पणज व अकोलखेड ही महसूल मंडळे अधिसूचित करण्यात आली आहेत. ही योजना अकोला जिल्ह्यासाठी एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमार्फत राबविण्यात येत आहे. शासन निर्णयान्वये संत्रा पिकासाठी कमी पाऊस (१५ जून ते २५ जुलै २०२१) व पावसाचा खंड (१६ जुलै ते १५ ऑगस्ट) हे हवामान धोके समाविष्ट करण्यात आलेले आहेत. संत्रा पिकासाठी १५ जून ते १५ जुलै या कालावधीत १२४ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाल्यास नुकसानभरपाई देय आहे. अकोला जिल्ह्यातील अकोलखेड महसूल मंडळामध्ये या कालावधी १२४ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद महावेध हवामानाच्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन हे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे निदर्शनास येते, असे आयुक्तालयाच्या पत्रात म्हटले आहे. 

अकोलखेड मंडळात १०१.७५ मि.मी. पाऊस  या संदर्भात पावसाच्या नोंदी ठेवणाऱ्या स्कायमेटचे सीईओ योगेश पाटील यांनी सांगितले, की १५ जून ते १५ जुलै २०२१ या काळात अकोट तालुक्यातील अकोलखेड मंडळात १०१.७५ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. 

हवामानकेंद्रांचा डाटा अभ्यासाः पाटील  राज्य शासकीय पुरस्कारप्राप्त शेतकरी संघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील म्हणाले, ‘‘खासगी कंपन्यांच्या माध्यमातून बसविण्यात आलेल्या हमामानकेंद्रांवर शेतकऱ्यांनी लक्ष ठेवायला हवे. तसेच, या केंद्रातील डाटादेखील वेळोवेळी अभ्यासून बघण्याची आवश्यकता आहे. काही मंडळात काही केंद्रांवर सदोष डाटा येत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही आलेल्या आहेत. मुळात, शेतकऱ्यांच्या फळपीकविम्याचे भवितव्य ठरविणारा हा डाटा महसूल मंडळात तपासणारी एक समिती हवी होती. त्यामुळे हवामानकेंद्राला स्थानिक पातळीवरील येणाऱ्या समस्या हाताळता येतील. तसेच, डाटा तपासूनच पुढे पाठवता येईल.’’ 

पावसाची नोंद चर्चेत  यंदाच्या हंगामात १५ जून ते १५ जुलै या काळात अकोट तालुक्यात झालेल्या पाऊस नोंदीचा विषय सध्या जिल्ह्यात चर्चेत आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार अकोलखेड मंडळात १२८ मिलिमीटर पाऊस झाला होता. तसा चार्ट त्यांना मिळाला होता. या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री तसेच कृषिमंत्र्यांनाही निवेदन पाठविले होते. असे असताना दुसरीकडे स्कायमेटने मात्र या मंडळात १०१.७५ मिलिमीटर पाऊस झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पावसाच्या या दोन्ही नोंदींमध्ये दिसत असलेली तफावत आता चर्चेचा विषय बनलेली आहे.  प्रतिक्रिया  या वर्षी आम्ही संत्रा मृग बहराचा विमा काढला आहे. कंपनीच्या नियमानुसार १२४ मिमीपेक्षा कमी पाऊस झाल्यास ४० हजार रुपये मदतीचा पहिला ट्रीगर लागणार होता. आमच्या भागात १५ जून ते १५ जुलै या काळात अत्यल्प पाऊस झाला. परंतु पावसाचे वाढीव आकडे दाखविण्यात आल्याची माहिती आम्हा शेतकऱ्यांना मिळाली आहे. असे झाल्यास शेतकरी मदतीपासून वंचित राहतील. तरी कंपनीने वस्तुस्थिती पाहून शेतकऱ्यांना संत्र्यासाठी पहिला ट्रिगर लागू करावा.  - शशिकांत गयधर, संत्रा उत्पादक, वस्तापूर ता. अकोट जि. अकोला. 

आमच्या भागात १५ जून ते १५ जुलैपर्यंत १२८ मिलिमीटर पाऊस दाखविण्यात आल्याचे आम्हा शेतकऱ्यांना समजले आहे. वास्तविक एवढा पाऊस झालेला नाही. उपरोक्त काळात पाऊसच नसल्याने आम्ही बागेला व पिकांना पाणी दिले. वस्तुस्थिती पाहून कंपनीने निर्णय घ्यावा व मदत द्यावी  - हरिदास वनकर, संत्रा उत्पादक, बोर्डी, ता. अकोट, जि. अकोला 

या वर्षी मी संत्रा मृग बहराचा विमा काढलेला आहे. कंपनी नियमानुसार १५ जून ते १५ जुलै या काळात १२४ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाल्यास पहिला ट्रिगर लागू होतो. यंदा या काळात अल्प पाऊस झाला. त्यामुळे आमच्या भागातील पेरणी ही जुलै महिन्यात झाली. जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिक्षकांनी आमच्या भागात येऊन बागांची अवस्था पाहावी व आम्हाला हक्काचा विमा मिळेल, अशी तरतूद करावी, ही मागणी आहे.  - आकाश पवार, संत्रा उत्पादक, अकोलखेड, ता. अकोट, जि.  अकोला 

माझे शेत पणज मंडळात येते. १५ जून ते १५ जुलै या काळात १२८ मिलिमीटर पाऊस झाल्याचे सांगितले जाते. मात्र एवढा पाऊसच झालेला नाही. पावसाअभावी आम्ही संत्रा, कपाशी व इतर पिकांना पाणी दिले. पाऊस झाला असता तर कशाला पाणी देण्याची गरज पडली असती. बागा न फुटल्याने यंदा आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेतकऱ्यांची अवस्था पाहून मदत द्यावी.  - देवानंद गयधर, अकोली जहाँगीर, ता. अकोट, जि. अकोला 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com