‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड लाख शेतकऱ्यांचे प्रस्ताव

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन टप्प्यांत मिळणार असून, ते थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या निधीचा लाभ मिळाला आहे. 

शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी किंवा अवजारांसाठी शासनाकडून मदत दिली जाणार आहे. ही योजना सुरू झाली तेव्हा केवळ दोन हेक्टर म्हणजेच पाच एकर जमिनीची मर्यादा घालून देण्यात आली होतो. ती मर्यादा केंद्र सरकारने हटविली असून, सर्वच शेतकऱ्‍यांना त्याचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आढावा बैठका घेतल्या. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड हे या योजनेकरिता जिल्ह्याचे नोडल ऑफिसर आहेत. नव्या निर्णयानंतर पात्र लाभार्थी आणि अपात्र लाभार्थी यांचे निकष नव्याने जारी करण्यात आले आहेत.

महसूल खात्याकडील नोंदीनुसार जिल्ह्यातील एकूण ८ अ प्रमाणपत्रांची संख्या ८ लाख ७ हजार १६८ आहे. क्षेत्रमर्यादा काढून टाकण्यात आल्यामुळे योजनेचा लाभ सर्वच शेतकऱ्‍यांना मिळू शकतो. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांची नावे, त्यांचे खाते क्रमांक तसेच आधार वापर आणि आयएफसी कोडसह बँकेतील खाते क्रमांक यांची नोंदणी करण्याची जबाबदारी तलाठी, ग्रामसेवक तसेच कृषी सहायकांकडे देण्यात आली आहे.

योजनेच्या सुधारित निर्णयानंतर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ८३,५४० तर दुसऱ्‍या टप्प्यात ६६,०६४ शेतकऱ्यांची यादी अपलोड झाली आहे. ही यादी दिल्ली येथील कृषी मंत्रालयात पाठविण्यात आली असून, या मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर निधीची रक्कम थेट शेतकऱ्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहे. या महिन्यात जिल्ह्यातील १६ हजारांहून अधिक शेतकऱ्‍यांना निधीचा लाभ मिळाला आहे.   

अशी आहे प्रस्तावांची संख्या
तालुका  लाभार्थी (पहिला टप्पा) लाभार्थी (दुसरा टप्पा)
मंडणगड    ३६५९ ३२१० 
दापोली   ११४५७  ८०१३ 
खेड   ८६६३  ३३५१
चिपळूण ११४९८ १३४१७ 
गुहागर  १०००० ३४३२
संगमेश्वर १८५९७ ९५१८
रत्नागिरी १६७६६ ८१४५ 
लांजा ८७९३  ८०१३ 
राजापूर १२०७८ १७५६६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com