वीस हजार हेक्टर क्षेत्राची  ई-पीकपाहणी परभणीत मंजूर 

ई-पीकपाहणी मोबाइल अॅपच्या अनुषंगाने पुरेशी जागृती न केल्यामुळे त्याबाबत अनेक शेतकरी अजून अनभिज्ञ आहेत. तलाठी स्तरावर देखील या बाबतीत उदासीनता असल्याचे चित्र आहे.
Of an area of twenty thousand hectares E-crop inspection approved in Parbhani
Of an area of twenty thousand hectares E-crop inspection approved in Parbhani

परभणी ः ई-पीकपाहणी मोबाइल अॅपच्या अनुषंगाने पुरेशी जागृती न केल्यामुळे त्याबाबत अनेक शेतकरी अजून अनभिज्ञ आहेत. तलाठी स्तरावर देखील या बाबतीत उदासीनता असल्याचे चित्र आहे. परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामात गुरुवारपर्यंत (ता. १७) २० हजार ६९९ खातेदार शेतकऱ्यांनी ई -पीकपाहणी केली तर तलाठीस्तरावर ४९३ खात्यांची पीकपाहणी करण्यात आली आहे. ई-पीकपाहणी आणि तलाठी स्तरावरील मिळून पीकपाहणी मंजूर केलेल्या खात्यांचे एकूण क्षेत्र १९ हजार ९७८.५४ हेक्टर आहे. 

परभणी जिल्ह्यातील शेती खात्यांची संख्या ५ लाख ३१ हजार १३३ असून, या खात्यांचे एकूण क्षेत्र ६ लाख ८ हजार ३६८.४६ हेक्टर आहे. गुरुवारपर्यंत (ता. १७) ई-पीकपाहणीतील २० हजार ६९९ पैकी १३ हजार ८६८ खात्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यांचे क्षेत्र १९ हजार ३८० हेक्टर आहे. तलाठी स्तरावर पाहणी झालेल्या ४९३ खात्यांचे क्षेत्र ५३८.४४ हेक्टर आहे. यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात २ लाख ५५ हजार हजार २४० हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात हरभऱ्याची १ लाख ३६ हजार ३६९ हेक्टर, ज्वारी ८० हजार ७९५ हेक्टर, गहू ३२ हजार ९६ हेक्टर, करडई १ हजार १८ हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश आहे. आजवर केवळ १९ हजार ९७८.५४ हेक्टरवरील पीकपाहणी मंजूर करण्यात आली आहे. 

महसूल विभागाचा ई-पीक नोंदणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१पासून राबविण्यात येत आहे. ई-पीकपाहणी मोबाइल अॅपद्वारे सर्व खातेदार शेतकऱ्यांना तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाइल वरून ७-१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येते. तलाठी स्तरावर देखील पीकपाहणी करण्यात येते. रब्बी हंगाम पीकपाहणी नोंदीसाठी ई-पीकपाहणी अॅपचे १.०.०.७ हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे.

रबी हंगाम प्रत्यक्ष ई-पीकपाहणीसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ई-पीकपाहणीबाबत नोंदणीचे आवाहन सातत्याने केले जात आहे. परंतु त्याबाबत संबंधित यंत्रणाकडून व्यापक जागृती केली जात नसल्याने त्याकडे शेतकरी दुर्लक्ष करत आहेत. अनेक भागात लवकर पेरणी केलेला हरभरा, गहू पिकांची सुगी सुरू झाली आहे. शेतातील उभ्या पिकांची ई-पीक नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा, हमीभावाने हरभरा विक्री नोंदणीसाठी तसेच अन्य कामांसाठी शेतकऱ्यांना अडचणी येऊ शकतात.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com