अटल भूजल अभियानाचा  जिल्ह्यात २५ डिसेंबरपासून प्रारंभ 

देशातील दुष्काळी जिल्ह्यांमधील भूजल पातळीत वाढ करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने राबविण्यात येणाऱ्या अटल भूजल अभियानाचा प्रारंभ २५ डिसेंबरपासून सुरू होत आहे.
Of the Atal Groundwater Mission Starting from 25th December in the district
Of the Atal Groundwater Mission Starting from 25th December in the district

पुणे ः देशातील दुष्काळी जिल्ह्यांमधील भूजल पातळीत वाढ करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने राबविण्यात येणाऱ्या अटल भूजल अभियानाचा प्रारंभ २५ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या अभियानांतर्गत राज्यातील १३ जिल्ह्यांमधील ३८ तालुक्यांची निवड केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि पुरंदर या दुष्काळी तालुक्यांतील ११८ गावांचा समावेश करण्यात आला आहे.  अटल भूजल अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील ११० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील ११८ गावांची निवड केली आहे. पाण्याची मागणी व पुरवठा व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करून भूजलाच्या साठ्यात शाश्‍वतता आणणे. यासाठी सद्यःस्थितीत सुरू असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांतील योजनांचा आधार घेणे, सिंचन व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे, या गावांमध्ये सूक्ष्म सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब करून भूजलाचा मर्यादित वापर करणे, सिंचन व्यवस्थापनात सुधारणे करणे आदी बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), पंतप्रधान कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन आदी योजनांचा आधार घेतला जाणार आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसा निमित्त २५ डिसेंबरला जिल्ह्यातील निवड झालेल्या गावांमध्ये शिवारफेरी काढून, प्रारंभ केला जाणार आहे. शिवारफेरीत भूजलाचा मर्यादित वापर करण्याबाबत जनजागृती करणे, त्यासाठीच्या प्रभावी उपाययोजना आणि शेतीसाठी जास्तीत जास्त ठिबक सिंचनाचा अवलंब करणे आदी बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे. यानुसार या गावांमध्ये ठिबक सिंचनासाठीचे साहित्य सहज उपलब्ध व्हावे, यासाठी ठिबक सिंचन साहित्याचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे आणि ठिबक सिंचन विक्रेत्या प्रतिनिधींच्या बैठका आयोजित करणे, ठिबक सिंचनासाठीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बॅंकांकडून कर्जपुरवठा करणे आदी मुद्द्यांबाबत माहिती दिली जाणार आहे. 

१३ जिल्ह्यांसाठी ९२५ कोटींचा निधी  जागतिक बॅंकेच्या सहकार्याने केंद्र सरकारने ही योजना पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह सात राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सहा हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद प्रस्तावित केली आहे. यापैकी केंद्र सरकार तीन हजार कोटी आणि जागतिक बॅंक तीन हजार कोटींचा निधीचा वाटा उचलणार आहे. एकूण निधीपैकी महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांसाठी ९२५ कोटी ७७ लाख रुपयांच्या निधीची तरतूद प्रस्तावित केली आहे. 

अटल योजना दृष्टिक्षेपात  पहिल्या टप्प्यात निवडलेली राज्य ः महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, हरियाना, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान.  राज्यातील निवड झालेले जिल्हे ः पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, नगर, जळगाव, जालना, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, बुलडाणा, नागपूर.  राज्यातील निवडलेल्या तालुक्यांची संख्या ः ३८  निवडलेल्या राज्यातील एकूण ग्रामपंचायती ः १ हजार ३३९  काम केल्या जाणाऱ्या गावांची संख्या ः १ हजार ४४३ 

प्रतिक्रिया 

अटल भूजल अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४५ माती नाला बांधचे रूपांतर सिमेंट नाला बांधमध्ये केले जाणार आहे. शिवाय या अभियानांतर्गत जलजीवन मिशनची कामे वेगाने केली जाणार आहेत. यासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्याबाबतचे काम जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाकडे सोपविले आहे.  - आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com