बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर सावट

सांगली जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे. अगोदर द्राक्षावरील संकटाची मालिका संपत नसताना आता बेदाणा निर्मितीवर संकट आले आहे.
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर सावट
Badanaya Nirnivar Saat

सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे. अगोदर द्राक्षावरील संकटाची मालिका संपत नसताना आता बेदाणा निर्मितीवर संकट आले आहे. मात्र, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे बेदाणा निर्मितीस अडथळे निर्माण झाले असून, बेदाण्याच्या दर्जावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.  जिल्ह्यातील बेदाणा निर्मितीचा हंगाम जानेवारीच्‍या मध्यावर सुरू होतो. यंदाच्या द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासून नैसर्गिक आपत्तीशी सामना करावा लागतो आहे. त्यातूनही शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा साधल्या आहेत. मात्र, मॉन्सूनोत्तर पावसामुळे पूर्व हंगामातील काढणीला आलेल्या द्राक्षांपासून बेदाणा निर्मितीसाठी शेतकरी पुढे आले आहेत. त्यामुळे यंदाचा हंगाम डिसेंबर महिन्यात सुरू झाला आहे. डिसेंबरमध्ये अनेक भागात बेदाणा शेडची दुरुस्ती, डागडुजी करण्यास बेदाणा शेड मालकांनी सुरू केली होती. ही कामे पूर्ण झाली आहेत. सध्या या भागात सुमारे ५०० ते ६०० शेडवर बेदाणा तयार होऊ लागला आहे. अनेक ठिकाणी बेदाणा निर्मितीची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी बेदाणा निर्मितीसाठी पुढे येत असून, शेडवर बेदाणा तयार करण्यासाठी कधी घेऊन येऊ, अशी विचारणा देखील करू लागले आहेत.  कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज परिसरात स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. बेदाणा निर्मितीसाठी पोषक असे वातावरण असते. मात्र, गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात वातावरणात बदल झाला आहे. कधी धुके, अति थंडी आणि ढगाळ वातावरणाचा फटका बेदाणा निर्मितीस बसू लागला आहे. परिणामी बेदाणा तयार होण्यास विलंब देखील होत आहे. त्यातच या बदलत्या वातावरणामुळे दर्जेदार बेदाणा तयार होत नाही. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. 

मार्केटिंगच्या द्राक्षापासून बेदाणा  जिल्ह्यात वर्षभर वातावरणाचा फटका द्राक्ष बागेला बसला आहे. त्यामुळे घडकूज, मणीकळ, डाऊनी या रोगाचा प्रादुर्भाव बागेवर झाला आहे. त्यातूनही वाढती थंडी यामुळे द्राक्षाला मागणी कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मार्केटिंगच्या द्राक्षापासून बेदाणा निर्मिती करण्यासाठी पुढे आले असल्याचे बेदाणा शेड मालकांनी सांगितले. मात्र, या द्राक्षांना गोडी नाही, ही गोडी बेदाण्यात येत नाही. त्यामुळे उतारा कमी मिळतो.  प्रतिक्रिया  यंदाच्या बेदाणा निर्मितीची गती वाढली आहे. परंतु बदलत्या वातावरणाचा फटका बेदाणा तयार करताना होत आहे. तसेच बेदाण्याच्या दर्जावरही त्याचा परिणाम होत आहे.  सुनील माळी, बेदाणा शेड मालक, केरेवाडी (ता. कवठेमहांकाळ)  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.