निर्यातीसाठी गहाण साखर देण्यास बॅंका राजी

निर्यातीसाठी गहाण साखर देण्यास बॅंका राजी
निर्यातीसाठी गहाण साखर देण्यास बॅंका राजी

पुणे : राज्यातील बॅंकांनी निर्यातीसाठी आपल्या ताब्यातील तारण साखर देण्यास अखेर होकार दिला आहे. बॅंकांनी आपली भूमिका बदलल्यामुळे राज्यात पडून असलेली किमान सात लाख टन साखर निर्यात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती साखर उद्योगातून देण्यात आली. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघाने शिखर बॅंकेकडे या समस्येसाठी जोरदार पाठपुरावा केला होता. कच्च्या साखरेची निर्यात १९०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दराने निर्यातदारांच्या ताब्यात द्यावी लागणार होती. मात्र, बॅंकांनी या साखरेचा भाव २९०० ते ३००० रुपये दर गृहीत धरून कारखान्यांना कर्ज दिले आहे. कर्जापोटी तयार साखर बॅंकांकडे गहाण आहे. गहाण असलेला माल कमी दराने देण्यास बॅंकांनी साफ नकार दिला होता. "या समस्येवर आता तोडगा निघालेला आहे. या व्यवहारात तयार होणाऱ्या अपुऱ्या दुराव्याची रक्कम कर्ज रुपात देण्यास शिखर बॅंक तयार झाली आहे. त्यामुळे ५१ साखर कारखान्यांची साखर निर्यात करण्याबाबत शिखर बॅंकेने तोडगा काढला आहे. राज्यातील इतर ५१ कारखान्यांची साखर विविध जिल्हा बॅंकांच्या ताब्यात आहे. या बॅंकांनीदेखील शिखर बॅंकेचा फॉर्म्युला वापरण्याचे ठरविले आहे. त्यामुळे १८५ पैकी किमान १०२ कारखान्यांची निर्यात होण्यात आता अडचण राहिलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. बॅंकांनी सध्या २००० रुपये प्रतिक्विंटलने साखर उपलब्ध करून दिल्यास केंद्र सरकारकडून निर्यातीपोटी मिळणारे १००० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान थेट बॅंकांनीच घ्यावे, असा तोडगा यापूर्वीच साखर उद्योगाने बॅंकांना सूचविला होता. राज्यातील सहकारी बॅंकांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने साखर निर्यातीला चालना मिळेल. यामुळे शेतकऱ्यांची एफआरपी देण्यासाठी कारखान्यांच्या हाती पैसा येईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

"साखर निर्यातीला चालना देण्यासाठी शिखर बॅंकेने घेतलेल्या भूमिकेचे साखर कारखान्यांनी स्वागत केले आहे. आता जिल्हा बॅंकांनीदेखील हेच धोरण ठेवून ताब्यातील साखर उपलब्ध करून द्यावी. कारखान्यांनी या संधीचा फायदा घेऊन निर्यातीवर लक्ष केंद्रित करावे."  - संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, साखर संघ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com