खतांच्या दरात मोठी वाढ 

खतांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. रब्बी हंगामात काळ्या बाजारातही खते मिळत नसल्याची स्थिती आहे. शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. पोटॅश, १०.२६.२६ सह इतर खतांच्या दरात अधिक वाढ झाली आहे.
 खतांच्या दरात मोठी वाढ 
Big increase in fertilizer prices

जळगाव ः  खतांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. रब्बी हंगामात काळ्या बाजारातही खते मिळत नसल्याची स्थिती आहे. शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. पोटॅश, १०.२६.२६ सह इतर खतांच्या दरात अधिक वाढ झाली आहे.  गेल्या खरिपात खते बऱ्यापैकी उपलब्ध झाली. रब्बीत खतांचे दर स्थिरावतील, अशी अपेक्षा होती. चांगल्या पावसामुळे खानदेश, विदर्भ, मराठवाडा व इतर भागांत पेरणी चांगली झाली आहे. खानदेशात तर पेरणी १८० टक्क्यांवर आहे. गहू, ज्वारी, मका या पिकांना पेरणी करताना व नंतरही खते दिली जातात. तसेच केळी, फळे, भाजीपाला, उसाच्या पिकाला देखील खतांची आवश्यकता विविध टप्प्यांमध्ये असते. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक खत वापर आहे. पण खतांचे दर गेल्या तीन महिन्यांत वाढून गगनाला जणू भिडले आहेत. १०.२६.२६ या खताचे दर खरिपात ११७५ रुपये प्रति गोणी (एक गोणी ५० किलो) एवढे होते. ते सध्या १५०० रुपये आहेत. पोटॅशचे (एक गोणी ५० किलो) दर खरिपात १०४० एवढे होते. नंतर त्यात आणखी वाढ होवून पोटॅशचे दर १३५० रुपये प्रति गोणी इतके झाले आणि सध्या, तर १७०० रुपये प्रति गोणी इतके दर आहेत. यातच गेल्या तीन महिन्यांपासून १०.२६.२६, १२.३२.१६, १४.३५.१४, डीएपी या खतांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. मोठा तुटवडा असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. कारण या खतांना ठोस पर्याय नाहीत. ऐन हंगामात ही समस्या तयार झाल्याने मोठे संकट उभे ठाकले आहे. पुरवठा लक्ष्यांक कृषी विभागाने मंजूर केले, पण पुरवठ्याची बोंबाबोंब सर्वत्र आहे.  सध्या फक्त सुपर फॉस्फेट व डीएपी या खतांची दरवाढ झालेली नाही. कारण ही खते सरकारच्या नियंत्रणात आहेत. पण डीएपीची पुरवठाच होत नसल्याची स्थिती आहे. जळगावात मध्यंतरी डीएपीचा पुरवठा झाला, पण त्या सोबत कंपनीने नॅनो युरिया घेण्याची सक्ती (लिकिंग) खत वितरकांना केली. नॅनो युरिया शेतकरी घेत नाहीत. त्यामुळे अनेक खत वितरकांनी डीएपी घेतला नसल्याची माहिती मिळाली. 

रावेरात खतचोरी  खानदेशात शेतांमध्ये कृषिपंपांची यंत्रणा, कापूस चोरी ऐकिवात होती. आता रासायनिक खतांची चोरीही शेतांमध्ये किंवा गोदामांतून होऊ लागली आहे. पिंप्री (ता. रावेर, जि. जळगाव) येथे गोपाल महाजन या शेतकऱ्याच्या गोदामातून आठ गोण्या पोटॅश व पाच गोण्या ०.०.५० या खतांची चोरी झाल्याचा प्रकारही घडला आहे. 

प्रतिक्रिया 

खतांच्या दरात दुप्पट वाढ गेल्या वर्षभरात किंवा १५ महिन्यांत झाली आहे. ही दरवाढ परवडणारी नाही. केळी, कांदा, पपई ही प्रमुख पिके खानदेशात कृत्रिम जलसाठाधारकांची आहेत. या शेतीमालाचे दर कमालीचे घटले आहेत. केळी, पपई शेतात काढणीअभावी पिकून खराब होत आहे. अशात खतांची दरवाढ गगनाला भिडल्याने मोठे वित्तीय संकट किंवा उत्पादन खर्च वाढल्याची समस्या तयार झाली आहे.  - अतुल पाटील, शेतकरी, केऱ्हाळे, (ता. रावेर, जि. जळगाव) 

प्रतिक्रिया  खतांचा पुरवठा गेले तीन महिने विस्कळीत आहे. दरवाढ या हंगामात झाली आहे. पोटॅश, १०.१६.२६, १४.३५.१४, १२.३२.१६ या खतांच्या बाबतीत अधिकची समस्या आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात फॉस्फरिक अॅसिड व पोटॅशचे दर वाढल्याने देशात सर्वच मिश्र खते व पोटॅशची दरवाढ झाली आहे. पोटॅशची १०० टक्के आयात करावी लागते. कोविडमुळे पोटॅशचे व्यवहार, पुरवठ्यावर परिणाम झाला. त्यामुळे त्याचे दर अधिकचे वाढले आहेत.  - निखील पोरवाल, खत विषयाचे जाणकार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.