खाद्यतेलातील तेजीचा  सोयाबीनला लाभ मिळणार? 

देशात पामतेलाची उपलब्धता कमी असल्याने सोयाबीन तेलाला उठाव मिळतो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे देशांतर्गत खाद्यतेलाच्या दराला आधार मिळतोय.
 खाद्यतेलातील तेजीचा  सोयाबीनला लाभ मिळणार? 
Boom in edible oil Will soybeans benefit?

पुणेः देशात पामतेलाची उपलब्धता कमी असल्याने सोयाबीन तेलाला उठाव मिळतो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे देशांतर्गत खाद्यतेलाच्या दराला आधार मिळतोय. त्यामुळे आठवडाभरात रिफाईंड सोयाबीन तेलाचे दर काहीशे सुधारले. मात्र सोयाबीन आणि सोयापेंडचे दर स्थिर होते. गेल्या आठवड्यात देशभरात प्रति क्विंटल ५ हजार ९०० ते ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सायोबीनचे व्यवहार झाले. पुढील काळात खाद्यतेलातील तेजीमुळे सोयाबीन दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर तेजीत आहेत. पामतेलाच्या दरालाही फोडणी मिळल्याने सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात वाढली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात पामतेलाचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच स्थानिक बाजारात मोहरीचे तेलही भाव खात असून, उपलब्धता कमीच आहे. परिणामी रिफाईंड सोयाबीन तेलाला उठाव मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा देशांतर्गत खाद्यतेलाच्या दरालाही आधार मिळत आहे. भारत सरकारच्या सतत बदलत्या धोरणांमुळे चालू वर्षात खाद्यतेलाची आयात कमी झाली. परिणामी देशात आता पाम तेलाचा तुटवडा जाणवत आहे, असे आयातदारांनी सांगितले. या सर्व कारणांनी देशात रिफाईंड सोयाबीन तेलाच्या दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. तेलाच्या दरवाढीचा आधार सोयाबीनलाही मिळत आहे. 

देशात रिफाईंड सोयाबीन तेलाला मागणी असल्याने प्लांट्सकडून सोयाबीनला मागणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र बाजारात सोयाबीनची आवक मर्यादीत आहे. त्यामुळे सोयाबीन दरात सुधारणा होण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. सोयाबीन आवकेचा विचार करता बाजारात दैनंदीन अडीच लाख पोत्यांच्या दरम्यान माल बाजारात आल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. मात्र मागील आठवड्यात सोयाबीनचे दर स्थिर राहिले. मध्य प्रदेशात मागील आठवड्यात सोयाबीन ६ हजार ते ६ हजार ४०० रुपयाने विकले गेले. तर महाराष्ट्रात ५ हजार ९०० ते ६ हजार ३५० रुपयाने सोयाबीनचे व्यवहार झाले. तर राजस्थानमध्ये ६ हजार ते ६ हजार ४०० रुपये सोयाबीनला दर मिळाला.  गेले आठवडाभर प्रक्रिया प्लांट्सचेही दर कायम होते. महाराष्ट्रातील प्लांट्सचे दर प्रति क्विंटल ६ हजार २०० ते ६ हजार ६५० रुपयांवर होते. तर मध्य प्रदेशात ६ हजार ३०० ते ६ हजार ५०० रुपये दर मिळाला. राजस्थानमध्ये प्लांट्सचे दर ६ हजार २०० ते ६ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान राहिले. 

सोयापेंडचे दर स्थिर  सोयाबीनसह गेल्या आठवड्यात सोयापेंडचेही दर स्थिरावले होते. जीएम सोयापेंडच्या तुलनेत अधिक दर आणि वाहतूक भाडे अधिक असल्याने निर्यातीसाठीची मागणी घटली आहे. त्यातच स्थानिक बाजारातही सोयापेंडला सामान्य मागणी राहिली. त्यामुळे दर स्थिरावले आहेत. राज्यनिहाय सोयापेंड दराचा विचार करता महाराष्ट्रात आठवडाभर ५३ हजार ते ५६ हजार ५०० रुपये प्रति टनाने व्यवहार झाले. मध्य प्रदेशात ५२ हजार ते ५५ हजार रुपयाने सोयापेंड विकले गेले. तर राजस्थानमध्ये ५२ हजार ते ५५ हजार ५०० रुपये दर मिळाला. 

सोयाबीन तेलाच्या दरात सुधारणा  पाम तेलाची कमी उपलब्धता असल्याने देशात सोयाबीन तेलाला उठाव मिळाला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात सोयाबीन तेलात प्रति १० किलोमागे ५० रुपयांची सुधारणा झाली होती. या सुधारणेसह महाराष्ट्रात १० किलो सोयाबीन तेलाचे व्यवहार १ हजार २२५ ते १ हजार २५५ रुपयाने झाले. मध्य प्रदेशात १ हजार २२५ ते १ हजार २४० रुपये तर राजस्थानमध्ये १ हजार २४० ते १ हजार २५० रुपयाने तेलाची विक्री झाली. रिफाईंड सरकी आणि पाम तेलाचेही दर वाढल्याने सोयाबीन तेलाला मागणी वाढण्याची शक्यता असल्याचे जाणकारांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com