संत्रा, मोसंबीवर ‘ब्राऊन रॉट’चा प्रादुर्भाव 

संत्रा व मोसंबीवर फायटोप्थोरा ब्राऊन रॉट या रोगाचा प्रादुर्भाव काटोल, नरखेड तालुक्यात दिसून आला आहे. त्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्याचे आवाहन केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने केले आहे.
brown rot
brown rot

नागपूर : संत्रा व मोसंबीवर फायटोप्थोरा ब्राऊन रॉट या रोगाचा प्रादुर्भाव काटोल, नरखेड तालुक्यात दिसून आला आहे. त्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्याचे आवाहन केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने केले आहे. 

फायटोप्थोरा या बुरशीमुळे ब्राऊन रॉट रोगाचा प्रादुर्भाव होतो. सतत दमट हवामान व पाण्याच्या निचरा न होण्याशी संबंधित हा रोग आहे. पावसाळ्याच्या उत्तरार्धात ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात जास्त प्रमाणात पाऊस पडल्यानंतर या रोगाचा प्रादुर्भाव समान्यत: दिसून येतो. या कालावधीमध्ये रोगामुळे होणारी फळगळ शेतकऱ्यांना गोंधळात टाकणारी असते. या रोगाची लक्षणे प्रामुख्याने सुरुवातीला परिपक्व किंवा परिपक्व होण्याच्या स्थितीत असलेल्या फळांवर आढळून येते. सुरुवातील पाणी शोषण केल्यासारखे घट्ट चमड्यासारखे चट्टे आढळून येतात. परंतु ते लवकर मऊ होतात आणि पृष्ठभागावर बुरशीच्या पांढुरक्या मायसेलियाची वाढ होते. 

संक्रमित फळ अखेरीस गळून पडते. फांद्या, पाने, व मोहोर तपकिरी रंगाचे होऊन झाडे मरतात. या रोगाची सर्वांत गंभीर बाब म्हणजे फळ तोडणीच्या आधी फळांवर लक्षणे दिसत नाहीत. साठवण आणि वाहतुकीच्या दरम्यान संक्रमित फळे निरोगी फळात मिसळल्यास चांगल्या फळांना या रोगाची लागण होऊन रोगाचा प्रसार होतो. रोगाला कारणीभूत दोन प्रजातींमध्ये फायटोप्थोरा पाल्मिव्होरा आणि फायटोप्थोरा निकोशियाने यांचा समावेश आहे. पैकी पाल्म्विोरा प्रजाती जास्त आक्रमक आहे. या प्रजातीचा प्रसार हवेमार्फत होऊन तो झाडांवरच्या फळांना संक्रमित करतो.  या उपाययोजना करा  जमिनीपासून २४ इंच किंवा त्यापेक्षा जास्त उंचीवरून झाडाची छाटणी केल्याने या रोगांचे प्रमाण कमी करता येते. जून, जुलैमध्ये किंवा पहिल्या पावसाच्या अगोदर कॉपरयुक्त बुरशीनाशकाची  शिफारशीत मात्रेत फवारणी करावी. १ टक्का बोर्डेक्स मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी. पाऊस जास्त पडल्यास ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या महिन्यामध्ये वरील बुरशीनाशकाची पुन्हा फवारणी करावी. या रोगाचा गंभीर धोका असल्यास उत्पादकांना संक्रमित फळबागांमध्ये फोसेटिल एएल किंवा मेटॅलॅक्झील एम २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. फळ तोडणीच्या वेळी संक्रमित फळे क्रेटमध्ये टाकू नयेत. याची खबरदारी घ्यावी. तसे केल्यास किंवा पॅकेजिंगची सुविधा नाकारण्यात येऊ शकते, असे आवाहन केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे डॉ. डी. के. घोष यांनी केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com