कालवे अस्तरीकरणाची कामे दर्जेदार करावीत ः उपमुख्यमंत्री पवार

कालवा अस्तरीकरणाची सुरू असलेली कामे दर्जेदार आणि गतीने करावीत. कामे खराब आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यासह अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
कालवे अस्तरीकरणाची कामे दर्जेदार करावीत ः उपमुख्यमंत्री पवार
Canal lining works should be done with quality: Deputy Chief Minister Pawar

पुणे ः कालव्यांमधून जास्त गळती होत असलेली ठिकाणे शोधून तेथील गळती थांबवण्याच्या उपाययोजना प्राधान्याने हाती घ्याव्यात. तसेच काही ठिकाणी कालवा अस्तरीकरणाची सुरू असलेली कामे दर्जेदार आणि गतीने करावीत. कामे खराब आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यासह अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

पुणे जिल्ह्यातील विविध धरण प्रकल्पांच्या कालवे सल्लागार समित्यांच्या बैठका पालकमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. १५) झाल्या. बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

नीरा उजवा कालवा, नीरा डावा कालवा, खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती बरी आहे. त्यामुळे यापूर्वीच्या नियोजनानुसारच रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी आवर्तनांचे नियोजन करावे. नीरा प्रणालीतून रब्बीचे एक आणि उन्हाळी दोन तर खडकवासला प्रकल्पातून रब्बीचे एक आणि उन्हाळी एका आवर्तनासोबत काटकसरीने पाणी बचत करून दुसरे आवर्तन सोडण्याचे बैठकीत ठरले. नीरा प्रणालीअंतर्गत प्रकल्पांमध्ये गतवर्षीपेक्षा सुमारे सव्वादोन टीएमसी अधिक पाणी असून समाधानकारक स्थिती असल्याने रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी आवर्तने सोडण्यास कोणतीही अडचण राहणार नाही, असे यावेळी सांगण्यात आले. 

पाणी काटकसरीने वापरून दोन आवर्तने देणे शक्य खडकवासला प्रकल्पातून पुणे शहरासाठी राखीव पाणीसाठ्यापेक्षा अधिक पाणी महानगरपालिका घेते. ते काटकसरीने वापरून खडकवासला प्रकल्पांतर्गत नवा मुठा उजवा कालव्यातून रब्बीसाठी एक आणि उन्हाळी दोन आवर्तने देणे शक्य आहे. त्यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना यावेळी पवार यांनी दिल्या.

बॅरेजेसचे प्रस्ताव सादर करा ः पवार तापी नदीवरील बॅरेजेसच्या धर्तीवर चासकमान प्रकल्पाच्या क्षेत्रात तसेच धरणाखाली प्रत्येकी एक टीएमसी साठवण क्षमतेचे तीन बॅरेजेस बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. चासकमान प्रकल्पातून सिंचनासाठी रब्बीचे एक आणि उन्हाळी दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय बैठकीत झाला. पवना प्रकल्प तसेच भामा आसखेड प्रकल्पातही समाधानकारक पाणीसाठा असून नियोजनाप्रमाणे पाणी सोडण्यात यावे, असे पवार यांनी सांगितले. तर चासकमान प्रकल्पात गतवर्षीपेक्षा सुमारे ३ टक्के अधिक पाणी आहे. त्यामुळे रब्बीसाठी एक आणि उन्हाळी दोन आवर्तने देण्याचे नियोजन करावे. कालव्यावरील लोखंडी पूल खराब झाले असल्याने दुसऱ्या बाजूस वाहने घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अंतराचा वळसा घालावा लागतो. त्यामुळे लोखंडी पुलांच्या बाजूला सिमेंटचे पूल बांधण्यासाठी जलसंपदा विभागाने तातडीने प्रस्ताव तयार करून सादर करावेत. त्यास निधीची तरतूद करण्यात येईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.