शेतकऱ्यांच्या आंदोलनातून केंद्राला धडा मिळेल : पवार 

किमान किमतीबाबत कायद्याची हमी द्या, आम्हाला फुकट काही नको, घामाची किंमत द्या, एवढीच काय ती दिल्लीत आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांची मागणी आहे.
sharad pawar
sharad pawar

सोलापूर ः किमान किमतीबाबत कायद्याची हमी द्या, आम्हाला फुकट काही नको, घामाची किंमत द्या, एवढीच काय ती दिल्लीत आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु केंद्र सरकार त्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे. पण आज ना उद्या केंद्र सरकारला यातून चांगलाच धडा मिळेल, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता.१३) येथे केंद्र सरकारच्या धोरणावर टिप्पणी केली. 

नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील कृषिभूषण दत्तात्रय काळे यांनी विकसित केलेल्या किंगबेरी या द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळा श्री. पवार यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बबनराव शिंदे, आमदार सुभाष देशमुख, आमदार यशवंत माने, आमदार संजय शिंदे, कृषिभूषण दत्तात्रय काळे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षेनेते बळीराम साठे या वेळी व्यासपीठावर होते. तत्पूर्वी श्री. पवार यांनी श्री. काळे यांच्या कारंबा येथील बागेत भेट देऊन या द्राक्षाची वैशिष्ट्य, बाजारपेठ, मिळणारा दर याबाबतची माहिती जाणून घेतली. याच कार्यक्रमात किंगबेरीबरोबर किंगसोनाका डिलक्स या बेदाण्याचेही लोकार्पण करण्यात आले. 

श्री. पवार म्हणाले, की पंजाब, हरियानाचे शेतकरी जवळपास अडीच महिन्यांपासून ऊन, पाऊस, वारा, थंडीचा विचार न करता दिल्लीत रस्त्यावर बसले आहेत. या आंदोलनाची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. ते सर्व गहू, तांदूळ पिकवणारे शेतकरी आहेत. ते त्यांच्याकडील महत्त्वाचं पीक आहे. किमतीच्या हमीबाबत धोरण घ्या, असं त्यांचं म्हणणं आहे. केंद्र सरकारच्या फूड कॅार्पोरेशन ऑफ इंडियानं त्यासाठी जबाबदारी घेतली पाहिजे. आमच्या काळात पंजाब, हरियानातून आम्ही गहू, तांदूळ खरेदी करत होतो, अगदी उत्तर- पश्‍चिम भारतातून तांदळाची खरेदी होत होती. पण मधल्या काळात ही पद्धत बंद करताना खरेदीबाबत काही वेगळी मते मांडली गेली. त्यामुळेच या राज्यातील शेतकरी बिथरला. आता तो किमान किमतीच्या कायद्याची हमी मागतो आहे, हा संघर्ष टळावा, ही सरकारकडून अपेक्षा आहे. आमच्या काळात अशी वेळ कधी आली नाही. आम्ही कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलो, पण हे सरकार काही धडा घ्यायला तयार नाही, पण त्यांना यापुढे चांगलाच धडा मिळेल, असेही ते म्हणाले. 

या वेळी माजी गृहमंत्री शिंदे यांनी काळे यांच्या शेतीची प्रयोगशीलता दखल घेण्यासारखी आहे. त्यांची तपश्‍चर्या, त्यांच्या संशोधनाची दखल पवार यांनी थेट शेतावर येऊन दिलेले प्रोत्साहन महत्त्वाचे आहे, असे सांगितले. प्रास्ताविकात दत्तात्रय काळे यांनी आतापर्यंत द्राक्षशेतीत केलेल्या कामाची आणि आगामी उद्दिष्टांची माहिती दिली.  काळेंचे म्हणून कौतुक  विज्ञानाशिवाय शेती होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. पण आधुनिकता, शास्त्रीय दृष्टिकोनाबरोबर ग्राहकांच्या गरजा, नावीन्यपूर्ण बदल लक्षात घेऊन शेती करणे आवश्यक बनले आहे. तरच बदलत्या काळात आपण टिकू, विशेषतः नव्या पिढीच्या शेतकऱ्यांनी अधिक शिकले पाहिजे, असे सांगताना काळे यांच्यासारखे शेतकरी शास्त्रज्ञांच्याही पुढे जाऊन काम करतात, हे त्यामुळेच कौतुकाचे वाटते, असेही श्री. पवार म्हणाले. 

निर्यात कंपन्यांना धडा शिकवू  माझ्याकडे कालच ८० निर्यातदार कंपन्यांची एक यादी आली आहे. त्यातील अनेक कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून घेतलेल्या मालाची देणी दिली नाहीत, तर काहींनी अधिक दराची अमिषे दाखवून फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत. उद्या मी दिल्लीला गेल्यावर संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणार आहे. फसवणूक करणाऱ्या या कंपन्यांनाही चांगलाच धडा शिकवू, असेही पवार म्हणाले.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com