सोयाबीनसाठी चीनची अमेरिकेवर मदार? 

ब्राझील आणि अर्जेंटिनात यंदा सोयाबीन उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनला आपला प्रतिस्पर्धी अमेरिकेच्या सोयाबीनवर अवलंबून राहावे लागेल.
सोयाबीनसाठी चीनची अमेरिकेवर मदार? 
China's dependence on US for soybeans?

पुणे ः ब्राझील आणि अर्जेंटिनात यंदा सोयाबीन उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनला आपला प्रतिस्पर्धी अमेरिकेच्या सोयाबीनवर अवलंबून राहावे लागेल. चीन जीएम सोयाबीनची आयात करतो, त्यामुळे भारताच्या नॉन जीएम आणि अधिक दर असलेल्या सोयाबीनची आयात करणार नाही. मात्र ब्राझील आणि अर्जेंटिनात उत्पादन घटले आहे, अमेरिकेच्या सोयाबीनचे दर सुधारल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड आणि सोयातेलाचेही दर सुधारतील. या स्थितीचा लाभ भारतीय सोयाबीनला होऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले.  सोयाबीन उत्पादनात ब्राझील आघाडीवर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. तर जगातील सर्वांत मोठा सोयाबीन आयातदार चीन आहे. चीन आणि अमेरिकेत नेहमी धुसफूस सुरूच असते. चीन नेहमी ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात करतो. परिणामी पण यंदा परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. चीन ब्राझीलमधून सोयाबीन खरेदी करत असला तरी यंदा ब्राझीलमध्ये वातावरणचा सोयाबीन पिकाला फटका बसतो आहे. ब्राझीलमधील स्थानिक संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार काही भागात अतिपाऊस तर पुरासह महत्वाच्या राज्यांत दुष्काळी स्थिती आणि उष्ण वातावरण असल्यानं उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.  ब्राझीलमध्ये सुरुवातीला १४०० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र बदलत्या वातावरणामुळे सोयाबीन पिकाला फटका बसतो आहे. त्यामुळे येथील उत्पादन १३३४ लाख टनांच्या दरम्यान राहील, असा अंदाज यूएसडीएने व्यक्त केला आहे. मात्र येथील काही भागांत सोयाबीन काढणी सुरु झाली असून, काही भागात आताच पेरा आटोपला आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम पिकावर होत आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये शेवटी उत्पादन किती हाती येईल, याचे अंदाजही बदलण्याची शक्यता आहे. अशीच परिस्थिती अर्जेंटिनातही आहे. त्यामुळे सोयाबीनची स्थानिक गरज भागविण्यासाठी चीनला अमेरिकेसह इतर देशांवर अवलंबून राहावे लागेल. 

चीनची अमेरिकेतून केलेली आयात  चीनने अमेरिकेतून २०२० मध्ये जवळपास २५८.९ लाख टन सोयाबीन आयात केली होती. मात्र २०२१ मध्ये आयातीत जवळपास ६४ लाख टनांनी वाढ होऊन ३२३ लाख टनांवर पोचली. तर चालू हंगामात म्हणजेच २०२२ मध्ये चीनची अमेरिकेतून सोयाबीन आयात आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

ब्राझीलमधून चीनची आयात  चीनमध्ये ब्राझीलमधून आयात झालेल्या सोयाबीनचा आढावा घेतला असता गेल्या हंगामात आयात घटल्याचे दिसून येते. ब्राझीलमधून चीनने २०२० मध्ये तब्बल ६४२.८ लाख टन सोयाबीन आयात केली होती. तर २०२१ मध्ये आयातीत ९.१ टक्के घट झाली आहे. २०२१ मध्ये ५८१.५ लाख टन ब्राझीलचे सोयाबीन चीनमध्ये दाखल झाले.    चीनच्या मागणीचा आंतरराष्ट्रीय  बाजाराला मिळेल आधार  यंदा चीनने खरंच अमेरिकेतून सोयाबीन आयात वाढविली तर अमेरिकेच्या सोयाबीनचे दर वाढतील. चीनसोबतच इतर देशांची मागणी या वेळी वाढलेली असेल. त्यामुळे अमेरिकेच्या सोयाबीनला झळाली येईल. अमेरिकेच्या सोयाबीनच्या दरात वाढ झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजार सीबॉटवर सोयाबीनचे दर सुधारतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

भारतीय सोयाबीनला लाभ मिळेल?  जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय सोयाबीन किंवा सोयापेंडला चीनच्या मागणीचा फायदा होणार नाही. कारण भारतीय सोयाबीन नॉन जीएम असल्याने दर जास्त असतात. तर चीनची मागणी स्वस्त मालाला असते. चीन नेहमी कमी दरात सोयाबीन आणि सोयापेंडची मागणी करत असतो. जीएम सोयाबीनपेक्षा चीन नॉन जीएमसाठी जास्त पैसे द्यायला तयार नसतो. ब्राझीलमध्ये सोयाबीन कमी उपलब्ध असले तरी चीन अमेरिका किंवा अर्जेंटिनातून कमी, अधिक दरात आयात करेल. भारतीय सोयाबीनला थेट चीनकडून मागणी नसेल. असे असले तरी चीनच्या मागणीने आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर सुधारल्यास सोयापेंड आणि सोयाबीन तेलाचेही दर वाढतील. सोयापेंड आणि सोयातेलाचे दर सुधारल्यास याचा लाभ मात्र भारतीय सोयाबीन होईल, असे जाणकारांनी सांगितले. 

प्रतिक्रिया 

चीनची मागणी जीएम सोयाबीनला असते. ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटिनात जीएम सोयाबीन होते. याचे दरही कमीच असतात. भारतीय सोयाबीन नॉन जीएम असल्याने दरही अधिक आहेत. चीन भारतीय सोयापेंडची नेहमी १०० डॉलर कमी दराने मागणी करतो. त्यामुळे चीन आपली मागणी पूर्ण करण्यासाठी भारताकडून सोयाबीन आयात करणार नाही. याच देशांकडून जीएम माल कमी दरात आणेल.  - सचिन अग्रवाल, सोयाबीन प्रक्रियादार आणि निर्यातदार   

सोयाबीन जीएम आहे की नॉन जीएम याचा चीनला फरक पडत नाही. जे कमी दरात मिळेल त्याची चीन आयात करणार. मग कोणताही देश असो. भारतीय सोयाबीन नॉन जीएम असल्याने महाग आहे. त्यामुळे चीन भारतीय मालाची आयात करण्याची शक्यता कमीच आहे.  - राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार अभ्यासक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.