बंद केलेले रोहित्र महावितरणकडून पूर्ववत जोडले
बुलडाणा : महावितरणने शेतकऱ्यांकडून सुरू केलेली सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी व बंद केलेले रोहित्र चालू करावेत, या मागणीसाठी स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी शेकडो शेतकऱ्यांसह बुधवारी (ता. २) संग्रामपूर येथे महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांच्या दबावापुढे प्रशासनाने नमते घेत बंद केलेले रोहित्र पुन्हा सुरू करून दिले. सध्या या भागात रब्बीतील पिके परिपक्व होण्याच्या अवस्थेत आलेले आहेत. अशा स्थितीत वीजबिल वसुलीच्या कारणाने तालुक्यात ५० ते ६० रोहित्र बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यात हाहाकार उडाला होता. महावितरणकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात होते. कांदा, हरभरा यासारखी पिके सुकण्याच्या मार्गावर असल्याने शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येथे ‘स्वाभिमानी’च्या नेतृत्वात महावितरणचे अभियंता श्री. नवलकर यांच्यासमोर आपबिती मांडली. अखेर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत बंद केलेले रोहित्र तत्काळ चालू करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. या वेळी रोशन देशमुख, जिल्हाध्यक्ष अनंता मानकर, तालुकाध्यक्ष उज्ज्वल पाटील खराटे, विजय ठाकरे, योगेश मुरूख, संतोष गाळकर, योगेश वखारे, शिवा पवार, प्रवीण पोपटनारे, आशिष सावळे, सुपडा सोनोने, रामकृष्ण गांवडे, महादेव चवरे, विठ्ठल वखारे, रवी चोपडे, गजानन रावणकार, दत्ता डिक्कर, ज्ञानेश्वर नांदने यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.