
भंडारा : तुमसर तालुक्यातील वैनगंगा, बावनथडी नद्यांच्या काठावरील गावांत पावसाळ्यात पुराचे पाणी शिरून शेतातील पिके आणि घरांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना अद्यापही मदत न मिळाल्याने त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. शासनाने या बाधितांची अडचण लक्षात घेता तत्काळ भरपाईचे निर्देश द्यावे, अशी मागणी आहे. नुकसान भरपाईबाबत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे प्रकल्पांनी पातळी ओलांडली होती. त्यामुळे मध्य प्रदेशातील संजय सरोवर तसेच महाराष्ट्रातील काही प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले. प्रकल्पातील या अतिरिक्त पाण्याने नद्या फुगल्या, नदीकाठावरील गावात तसेच शेतशिवारात हे पाणी शिरले. शेत खरडून गेली अणि त्यात वाळूचा थर साचला. घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले.
तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात अशाप्रकारे नुकसान झालेल्या बाधितांची संख्या मोठी आहे. या नुकसानीचे सर्व्हेक्षणही करण्यात आले. सर्व्हेक्षणानंतर प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु एक छदामही अद्यापपर्यंत देण्यात आला नाही. परिणामी नागरिकांमध्ये अस्वस्थता व असंतोष निर्माण झाला आहे. बाधित कुटुंब भरपाई मिळेल, या अपेक्षेने सातत्याने बॅंकेत चकरा मारत आहेत.
परंतु शासनाकडूनच निधी मिळाला नसल्याने खात्यात जमा झाला नाही. शासनाने एकंदर स्थितीचा अंदाज घेत मदत द्यावी, अन्यथा या विरोधात आंदोलनाचा इशारा युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम यांनी दिला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.