मांघर गावात साकारणार ‘मधाचे गाव’ संकल्पना

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मध संचालनालयाच्या मार्फत महाबळेश्‍वर येथील मांघर या गावात ‘मधाचे गाव’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
The concept of 'Madhache Gaav' will be implemented in Manghar village
The concept of 'Madhache Gaav' will be implemented in Manghar village

सातारा : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मध संचालनालयाच्या मार्फत महाबळेश्‍वर येथील मांघर या गावात ‘मधाचे गाव’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. निसर्गातील मधमाश्‍यांची घटती संख्या चिंताजनक आहे. अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या मधमाशांना वाचविणे काळाची गरज ठरणार आहे. मधमाश्‍यापालन आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा. या उद्देशाने महाबळेश्‍वर येथील मांघर या गावात ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येत असल्याची माहिती खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा यांनी दिली आहे.

राज्यातीलच नव्हे तर देशातील हे लोकप्रिय पर्यटन केंद्र आहे. महाबळेश्‍वरचा शुद्ध मध अनेक लोक घेत असतात. मधमाश्‍यांविषयीची जनजागृती प्रचार प्रसिद्धी होण्यासाठी तसेच डोंगराळ भागातील लोकांना कायमस्वरूपी रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने मधाचे गाव म्हणून मांघर गावाची निवड करण्यात आली आहे.

मांघर या गावात शासनाच्या विविध योजना अतिशय यशस्वीपणे राबविण्यात आल्या आहेत. शिवाय या गावातील बहुतांश लोक मधमाश्‍यापालन करीत आहेत. मधाचे गाव या संकल्पनेत शासनाच्या विविध यंत्रणांचा सहभाग असेल. सातारा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

मधमाश्‍यांचे संवर्धन व संरक्षण होण्याबरोबरच स्थानिक लोकांना कायमचा रोजगार आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी विविध उपक्रम या निमित्ताने गावात राबविण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती सिन्हा यांनी दिली. मधाच्या गावात मधमाश्‍यांना पूरक अशा वनस्पतींची लागवड वन विभागामार्फत करण्यात येणार आहे. गावातील घरांचे मधमाश्‍यांची थीम वापरून सुशोभीकरण केले जाणार आहे. 

या गावात मधमाश्‍यापालन ते मधविक्रीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया लोकांना पाहता येईल. मधमाश्‍यांची संख्या वाढविण्यासाठी गावात राणी पैदास कार्यक्रम व त्या अनुषंगाने प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. मधमाश्‍यांना उपयुक्त पिकांची लागवड करण्यासाठी कृषी विभागाचे साह्य घेण्यात येणार आहे.

मधमाश्‍या संवर्धनासाठी प्रयत्नशील ‘मधाचे गाव’ ही संकल्पना मधमाशांना पूरक असणाऱ्या भागात टप्प्याटप्याने राज्यातील प्रमुख जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. मधाचे गाव या संकल्पनेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेलच पण निसर्गपूरक व्यवसायास प्रोत्साहन देखील मिळणार आहे. मधमाश्‍यांचे संवर्धन होण्यासाठी खादी व ग्रामोद्योग विभाग प्रयत्नशील आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com