बाजार शुल्कावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे लक्षः दानवे  

शेती विषयक कायद्यांमुळे बाजार समित्यांतील दलालाची पद्धत बंद होऊन शेतकऱ्यांना ऊर्जित अवस्था प्राप्त होण्यास मदत होणार आहे.
Raosaheb Danve
Raosaheb Danve

लातूर ः शेती विषयक कायद्यांमुळे बाजार समित्यांतील दलालाची पद्धत बंद होऊन शेतकऱ्यांना ऊर्जित अवस्था प्राप्त होण्यास मदत होणार आहे. पण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकऱ्यांत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. या दोन्ही पक्षांचे बाजार समितीच्या माध्यमातून मिळणाऱ्या बाजार शुल्कावर लक्ष आहे. या कायद्याची अंमलबजावणी करणार नाही, असे राज्य सरकार सांगत असले तरी याचे त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी रविवारी (ता. ४) येथे पत्रकार परिषदेत दिला. ‘‘गेल्या दोन लोकसभेच्या निवडणुकीत सपाटून आपटल्यानंतर काळे तोंड झालेले काँग्रेस आता गोरे करता येते का? हे पाहत आहे. लोकांसमोर जाण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाही. मोदी सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या आहेत. नवीन कायदेही त्याचा एक भाग आहे. पण काँग्रेसकडून शेतकऱ्यांत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांचा पंतप्रधान, कृषिमंत्री तसेच न्याय व्यवस्थेवरही भरवसानाही. त्यामुळे लोकांचा तरी त्यांच्यावर कसा भरवसा बसेल,’’ असा टोलाही मंत्री दानवे यांनी यावेळी लगावला. ‘‘नवीन कायद्यांमुळे बाजार समित्या रद्द होणार नाहीत. पण प्रचलित विक्रीची पद्धत बंद होईल. कोणत्याही व्यापाऱ्याला शेतकऱ्याचा माल खरेदी करता येईल. यातून शेतमालाला चांगले भाव मिळतील. गुंतवणुकदार पुढे येतील. यावर सरकारचे नियंत्रण असणारच आहे. शेतकऱ्यांना ऊर्जित अवस्था येईल. बाजार समित्यांतील दलाली बंद होईल. बाजार शुल्कावरच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष आहे. हे शुल्क वाटून घेण्यासाठी विरोध केला जात आहे. कायदा पाळावा लागेल अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील,’’ असा इशाराही त्यांनी दिला.  राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात टिकू शकला नाही. आरक्षण मिळावे ही भाजपची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी तोल जाऊन पडले हाथरस (उत्तरप्रदेश) येथील घटनेसंदर्भात सरकार गंभीर आहे. काँग्रेसेचे नेते राहुल गांधी यांना कोणीही धक्काबुक्की केलेली नाही. आम्ही त्यांचा सन्मानच करतो. गर्दीत जायची राहुल गांधी यांना सवय नाही. आता ते गर्दीत गेले. त्यामुळे तोल जाऊन ते पडले, अशा शब्दात श्री. दानवे पाटील यांनी उत्तर प्रदेश सरकारची पाठराखण केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com