कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार संवर्धन 

भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी डच आणि पोर्तुगाल राजवटींसह छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी कोकणात उभारलेल्या वखारींचे संवर्धन होणार आहे.
कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार संवर्धन  Conservation of Dutch and Portuguese warehouses in Konkan
कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार संवर्धन  Conservation of Dutch and Portuguese warehouses in Konkan

पुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी डच आणि पोर्तुगाल राजवटींसह छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी कोकणात उभारलेल्या वखारींचे संवर्धन होणार आहे. वखारींचे संवर्धन होऊन त्या ठिकाणी ऐतिहासिक व्यापाराच्या माहितीचे संग्रहालय करावे, अशी मागणी जुन्नरच्या (जि.पुणे) सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने राज्य वखार महामंडळाकडे केली आहे. या बाबत महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी महामंडळाच्या सामाजिक दायित्व निधीद्वारे संवर्धनासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे.  सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने वखार महामंडळाला पत्र दिले आहे. या बाबत बोलताना ‘सह्याद्री’ चे अध्यक्ष संजय खत्री म्हणाले, ‘‘महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ १९५७ पासून कार्यरत असून, महामंडळाच्या वतीने राज्यातील अन्नधान्य साठवणुकीसाठी २०० पेक्षा अधिक ठिकाणी १ हजार १०० गोदामे उभारली आहेत. या गोदामांचा उपयोग शेतकऱ्यांना होतो आहे. वखार महामंडळाद्वारे नव्याने अत्याधुनिक गोदामे उभारली जात असताना, मात्र भारतात सागरी मार्गाद्वारे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी डच, पोर्तुगीज आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी कोकणात आणि विशेषतः राजापूर, वेंगुर्ले परिसरात सागरी किनारपट्टीलगत अनेक वखारी बांधल्या. मात्र काळाच्या ओघात या वखारींची पडझड झाली असून, त्या शेवटच्या घटका मोजत आहेत.’’  कोकणातील ऐतिहासिक वखारी या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत. सागरी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा इतिहास येणाऱ्या पिढीला ज्ञात व्हावा, यासाठी या वखारींचे संवर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी राजापूर आणि वेंगुर्ले येथील इतिहासप्रेमी, अभ्यासकांनी अनेक वेळा शासनाच्या शासनाच्या विविध विभागांसोबत पाठपुरावा केला. मात्र त्याला अद्याप यश आलेले नाही. राज्य वखार महामंडळ मोठ्या प्रमाणावर राज्यात गोदामे (वखारी) उभारत आहे. मात्र वखार महामंडळाच्या निदर्शनास कोकणातील ऐतिहासिक वखारींच्या संवर्धनाची बाब निदर्शनास आणून दिली नाही. या बाबत आम्ही वखार महामंडळाला त्यांच्याच क्षेत्रातील वखारींच्या दुर्देशीची बाब निदर्शनास आणून देत वखारींच्या संवर्धनाची मागणी केली आहे. या बाबत वखार महामंडळाचे अध्यक्ष दीपक तावरे सकारात्मक आहेत.  पुरातत्त्व, पर्यटन आणि सांस्कृतिक विभागासोबत समन्वय साधावा  कोकणातील वखारींचा पुरातत्त्व, पर्यटन आणि सांस्कृतिक संबंध असल्याने राज्य शासनाच्या या तीन विभागासोबत वखार महामंडळाने समन्वय साधत संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा. या चार विभागांनी समन्वय साधत किमान एका वखारीचे संवर्धन करून, त्या ठिकाणी भारताच्या सागरी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माहितीचे संग्रहालय उभारावे. या संग्रहालयाच्या माध्यमातून सांस्कृतिक ठेवा देखील संवर्धित होऊन, पर्यटकांना चांगली माहिती मिळेल, असेही संस्थेने सुचविले आहे. 

प्रतिक्रिया

कोकणातील वखारींच्या संवर्धनाबाबतची बाब प्रथमच निदर्शनास आली. सागरी किनारपट्टीलगत असलेल्या वखारी या भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापार इतिहासाचा वारसा आहे. त्याच्या संवर्धनासाठी संबंधित विविध विभागासोबत समन्वय साधत, सकारात्मक कार्यवाही करू.  -दीपक तावरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  राज्य वखार महामंडळ, पुणे   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com