कापसाला बोंडातच फुटले कोंब 

यंदा अगोदरच वेगवेगळ्या संकटातून पीक हाती पडायला लागले आणि ऐन वेचणीच्या काळात पाऊस सुरू झाला. त्यामुळे पहिली वेचणीही करता आली नाही. सतत पडत असलेल्या पावसाने कापसातील बियाण्याचे कोंब फुटले आहे. शिवाय कापूस काळा पडला आहे. त्यामुळे वजनात घट तर होईलच, पण दरातही मोठा फटका सोसावा लागणार आहे. - शिवाजी बद्रीनाथ तुपे, कापूस उत्पादक शेतकरी, कोळवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड
पीक नुकसान
पीक नुकसान

नगर ः आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने वेचणीला आलेल्या कापसाची अक्षरशः माती केली. नगरसह  मराठवाडा, विदर्भात कापसाला बोडांतच कोंब फुटले असल्याने मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे वीस ते पंचवीस लाख हेक्टर क्षेत्रावरील एका वेचणीचा कापूस वाया गेला आहे. काढणीला आलेल्या व काढून टाकलेल्या बाजरी, सोयाबीनचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदाही कापूस, सोयाबीन उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे. 

नगरसह मराठवाडा, सोलापूर, विदर्भातील बहुतांश भागामध्ये खरिपात लागवड करून कापसाचे पीक घेतले जाते. पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यांमधील काही भागांतही आता कापूस रुजू लागला आहे. नगर जिल्ह्यामध्ये साधारण सव्वा लाख, मराठवाड्यात पंचवीस लाख हेक्टर अन्य भागांत मिळून साधारण पस्तीत ते चाळीस लाख हेक्टर दरवर्षी कापसाचे क्षेत्र असते. जून ते ऑगस्ट या काळात लागवड झालेला कापूस शक्यतो दसरा, दिवाळीच्या काळात वेचणला येतो. गेल्या दोन वर्षांत पाऊस नसल्याचा कापूस उत्पादनावर परिणाम झाले. यंदा सुरवातीला झालेल्या पावसावर लागवड झाली, मात्र नंतरच्या काळातील पावसाच्या खंडामुळे कापसाला फटका बसला. वाढ खुंटली, बोंडेही कमी लागली. जे आले त्याची वेचणी सुरू करायला सुरवात झाली आणि गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे वेचणीला आलेली बोंडे सतत आठ दिवस भिजत राहिल्याने कापूस तर काळा पडलाच पण बोंडालाच कोंब फुटले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नगर जिल्ह्यामध्ये ८० हजार हेक्टरवर तर राज्यात पंचवीस लाख हेक्टरवरील पहिल्या वेचणीचा कापूस वाया गेला आहे. 

कापसासोबत बाजरी, सोयाबीनचेही खरिपात मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. दसरा ते दिवाळी या काळात बाजरी, सोयीबीनची काढणी केली जाते. यंदा मात्र पावसाने बाजरी, सोयाबीनचीही काढणी करता आली नाही. त्यामुळे काढणी केलेल्या व काढणीला आलेल्या बाजरी, सोयाबीनचेही मोठे नुकसान झाले आहे. बाजरीच्या कणसाला आणि सोयाबीनच्या शेंगानाही कोंब फुटले आहे. त्याचाही मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे गतवर्षी पाऊस नसल्याने पिके आली नाही आणि यंदा पावसाने आलेली बहुतांश पिके वाया गेली असल्याने गतवर्षीपेक्षाही गंभीर स्थिती असल्याचे शेतकरी सांगत आहेत.  कृषी विभाग दिवाळीत दंग  नगरसह राज्याच्या अनेक भागांत कापूस, सोयाबीन, बाजरी, कांदा पावसाने वाया गेला आहे. फुलशेतीची दशा झाली आहे. पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे होणे गरजेचे आहे. मात्र, नगरसह अनेक भागांत अजूनही पंचनामे करण्यासाठी, झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी विभाग अथवा प्रशासनाचे कोणीही फिरकले नाही. कृषी विभागाची ही जबाबदारी असताना कषी विभागाही दिवाळीत दंग असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे नव्याने निवडून आलेले आणि पराभूत झालेले नेतेही फिरकले नाही.     प्रतिक्रिया सतत आठ ते दहा दिवस पडत असलेल्या पावसाने पिकांची मोठी हानी झालेली आहे. बाजरी, तूर, कापूस, कांदा, सोयाबीन, वाया गेले आहे. जवळपास ८० टक्के नुकसान झाले. त्यामुळे यंदा दुष्काळापेक्षाही गंभीर संकट शेतकऱ्यांवर आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची गरज आहे. - अनिल औताडे, तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना, श्रीरामपूर, जि. नगर  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com