कापूस खेडा खरेदी करणाऱ्या  व्यापाऱ्यांकडून दीड लाखाची वसुली 

खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वजनात लुटण्यासोबतच बाजार समितीचा सेस व शासनाचा महसूल बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात शेगाव बाजार समितीने धडक मोहीम उघडली आहे.
Cotton field buyers Recovery of Rs 1.5 lakh from traders
Cotton field buyers Recovery of Rs 1.5 lakh from traders

बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वजनात लुटण्यासोबतच बाजार समितीचा सेस व शासनाचा महसूल बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात शेगाव बाजार समितीने धडक मोहीम उघडली आहे. एका आठवडाभरात तब्बल १६ व्यापाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपयांचा सेस वसूल करण्यात आल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे.  विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात कापूस प्रमुख पिकांपैकी एक आहे. शेगाव तालुक्यातील कापसाचे मोठे क्षेत्र राहते. या तालुक्यात ७३ गावे बाजार समिती कार्यक्षेत्रात येतात. तालुक्यातून बाजार समितीत रोजची कापसाची आवक सरासरी ३ हजार क्विंटलची राहते. गेल्या हंगामात पणन महासंघाकडून हमीभाव योजने अंतर्गत कापूस खरेदी करण्यात आलेली होती. त्यानुसार शेगाव शासकीय कापूस खरेदी केंद्रावर व परवाना धारक खासगी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये बाजार समितीत ५५ हजार क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी गेल्या हंगामात झाली होती.  या वर्षी कापसाचे दर तेजीत असल्याने बाजार समितीऐवजी खेडा खरेदीच्या माध्यमातून व्यापारी कापसाची उचल करीत आहेत. त्यामुळे बाजार समितीचा व शासनाचा महसूल बुडत असल्याने बाजार समिती व्यवस्थापनाने या विरोधात कारवाईचा निर्णय घेतला. त्या अंतर्गत कोणताही परवाना नसताना बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात कापसाची खरेदी करणाऱ्या शेगाव कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्रा बाहेरील सुमारे १६ व्यापाऱ्यांवर कारवाई करून १ लाख २० हजार रुपयांचा बाजार शुल्क, देखरेख शुल्क, असा सेस वसूल करण्यात आला. शेगाव बाजार समितीमध्ये कापसावर सुमारे प्रती शेकडा १ रुपया ५ पैसे कर आकारला जातो. हा महसूल बुडतो त्यासोबतच खेडा खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता देखील अधिक राहते. परिणामी बाजार समितीने उचललेल्या या पावलामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. 

प्रतिक्रिया   बाजार कायदा, नियमांनुसार स्थानिक प्राधिकरणाच्या मदतीने समितीचा कर बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांकडून समितीला तीन पट दंड आकारून सेस वसूल करण्याचा अधिकार आहे. खेडा खरेदीतून शेतीमाल घेणाऱ्या व्यापाऱ्यांचा वजन काटा तपासला जातो. या माध्यमातूनही शेतकऱ्यांच्या लुटीचे प्रकार घडण्याची शक्यता असते. त्यासोबतच त्यांच्याकडे खरेदीचा अधिकृत परवाना आहे किंवा नाही हे देखील तपासले जाते. परवाना नसलेल्या १५ ते १६ व्यापाऱ्यांवर एका आठवड्याभरात कारवाई करण्यात आली असून, त्या माध्यमातून १ लाख २० हजार रुपयांच्या बाजार फी व देखरेख सेसची वसुली बाजार समितीचे भरारी पथकामार्फत करण्यात आली आहे.  -विलास पुंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगाव   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com