देशात ४७.२१ लाख टन साखरेचे उत्पादन

देशातील साखर हंगाम वेगाने सुरू झाला आहे. ३० नोव्हेंबर अखेर देशातील ४१६ कारखान्यांनी ४७.२१ लाख टन साखरेचे उत्पादन केले. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे उत्पादन ७ लाख टनांनी अधिक आहे.
The country produces 47.21 lakh tonnes of sugar
The country produces 47.21 lakh tonnes of sugar

कोल्हापूर : देशातील साखर हंगाम वेगाने सुरू झाला आहे. ३० नोव्हेंबर अखेर देशातील ४१६ कारखान्यांनी ४७.२१ लाख टन साखरेचे उत्पादन केले. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे उत्पादन ७ लाख टनांनी अधिक आहे. गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत देशात ४०९ कारखाने सुरू होते त्यांनी ४३ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.

नोव्हेंबर अखेरच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राने पंधरवड्यापूर्वी घेतलेली साखर निर्मितीतील आघाडी कायम ठेवली आहे. महाराष्ट्र खालोखाल कर्नाटकने साखर निर्मितीत बाजी मारली असून या कालावधीत कर्नाटकने १२.७६ लाख टन साखर तयार केली आहे. उत्तर प्रदेशची घसरण तिसऱ्या स्थानावर झाली आहे. उत्तर प्रदेशने १०.३९ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. ऑक्टोबरला देशातील साखर हंगाम सुरू झाला. यंदा महाराष्ट्रातून साखरेचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. हंगाम सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या महिन्यात तरी महाराष्ट्राने अंदाजानुसार साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. प्रत्येक वर्षी सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या उत्तर प्रदेशची घसरण तिसऱ्या स्थानावर झाली आहे. पावसाळी हवामानामुळे उत्तर प्रदेशात अजूनही मोठ्या प्रमाणात साखर कारखाने सुरू झाले नसल्याने साखर निर्मिती कमी होत असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

विक्री स्थिती यंदाच्या हंगामाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर, २०२१ मध्ये एकूण विक्री सुमारे २४.५० लाख टन होती, जी सरकारने दिलेल्या २४ लाख टनांच्या देशांतर्गत विक्री कोट्याच्या तुलनेत बरोबरीने होती. सरकारने सप्टेंबर चा २.५ लाख टन अतिरिक्त कोट्याच्या विक्रीचा कालावधी ३१ ऑक्टोबर पर्यंत वाढवला होता. सणासुदीच्या वाढीव मागणीमुळे या कालावधीत विक्री जास्त आहे.

निर्यातीत ही महाराष्ट्र, कर्नाटकचे वर्चस्व उपलब्ध माहितीनुसार, यंदाच्या हंगामात निर्यातीसाठी सुमारे ३५ लाख टन साखर निर्यातीचे करार आधीच झाले आहेत. जेव्हा कच्या साखरेच्या किमती २०-२१ सेंट्स होत्या त्यावेळी हे करार झाले. सध्या कच्च्या साखरेच्या किमती १८.६  सेंट्सच्या आसपास आहेत. यामुळे कराराची सुरुवातीची गती काहीशी मंदावली आहे. किमती आणखी वाढण्याचा प्रतीक्षेत साखर कारखानदार आहेत. साखर निर्यातीत ही महाराष्ट्र, कर्नाटक ही राज्ये आघाडीवर आहेत. उत्तरेकडील राज्य अद्यापही निर्यातीच्या बाबतीत ही मागे असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. 

महाराष्ट्रात पंधरवड्यात  साखर निर्मितीत घट महाराष्ट्रात सध्या होणारा मॉन्सूनोत्तर पाऊस वेगाने सुरू होणाऱ्या गणिताला ब्रेक लावण्याचे काम करीत आहे. विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने ऊस तोडणीला मोठे अडथळे आले. अनेक ठिकाणी ऊस तोडणी ठप्प झाली आहे. याचा साहजिकच परिणाम साखर निर्मितीवर होणार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन पश्चिम महाराष्ट्रात असल्याने डिसेंबरच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची साखर उत्पादनाची गती काहीशी कमी राहण्याची शक्यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com