देशातील कापूस उत्पादन ३१० लाख गाठींवर स्थिरावणार

देशाच्या कापूस उत्पादनात गेल्या काही वर्षांनंतर मोठी घट येणार असून, वस्त्रोद्योगाची मागणी पूर्ण करणेही अशक्य होणार आहे. उत्पादन ३१० ते ३१२ लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) एवढेच येवू शकते.
देशातील कापूस उत्पादन ३१० लाख गाठींवर स्थिरावणार
The country's cotton production will stabilize at 310 lakh bales

जळगाव ः देशाच्या कापूस उत्पादनात गेल्या काही वर्षांनंतर मोठी घट येणार असून, वस्त्रोद्योगाची मागणी पूर्ण करणेही अशक्य होणार आहे. उत्पादन ३१० ते ३१२ लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) एवढेच येवू शकते. प्रतिकूल स्थिती, गुलाबी बोंड अळीचा उद्रेक यामुळे कापूसटंचाईचे संकट देशात उभे राहिल्याचे दिसत आहे. 

देशात यंदा कापूस लागवडीत वाढ झाली. १२९ लाख हेक्टरवर पिकाची लागवड झाली. गेल्या हंगामातील लागवड सुमारे १२६ लाख हेक्टरवर होती. लागवडीत महाराष्ट्र आघाडीवर होता. राज्यात सुमारे ४२ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. जगात सर्वाधिक कापूस लागवड देशात होत असते. जगात सर्वाधिक उत्पादन मात्र चीनमध्ये होत आहे. चीनमध्ये ३४ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. तेथे गेल्या हंगामात ३६० लाख गाठींचे उत्पादन आले. यंदाही ३५५ लाख गाठींवर उत्पादन तेथे होईल. देशाचे उत्पादन मात्र लागवड अधिक असूनही घटणार आहे. बोंडअळी व अतिपावसाने महाराष्ट्र, गुजरात, उत्तर व दक्षिण भारतात पिकाची मोठी हानी गेले दोन हंगाम झाली आहे. २०१९-२० नंतर या हंगामात उत्पादनात मोठी घट येणार आहे. 

अंदाज सतत बदलले देशात यंदा कापूस लागवडीत चांगली वाढ झाली. यामुळे ४०० लाख गाठींचे उत्पादन येईल, असा अंदाज जूनमध्ये किंवा कापूस लागवड हंगामाच्या सुरुवातीला देशात विविध संस्थांनी व्यक्त केला. जुलै-ऑगस्टमध्ये ३८० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता. नंतर ३६० ते ३६५ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होता. तर नव्या वर्षात कापसाची आवक व पीकस्थिती यानुसार कापूस उत्पादन ३१५ लाख गाठींपर्यंत येईल, असे सांगितले जात आहे. 

देशातील गरज पूर्ण करणे अशक्य कोविड व लॉकडाउनच्या फटक्यातून देशातील वस्त्रोद्योग यंदा सावरला. सूत, कापड उद्योगाने गती घेतली. यामुळे यंदा देशात किमान ३२० ते ३२५ लाख गाठींची गरज वस्त्रोद्योगाला आहे. पण एवढी गरज पूर्ण करणे अशक्य होईल. कारण देशात कापसाचे उत्पादन घटले आहे. आवकही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. गेल्या वर्षी जानेवारीच्या मध्यापर्यंत देशात २०५ लाख गाठींची आवक देशाच्या बाजारात झाली होती. यंदा यात ४० लाख गाठींची तूट आहे. देशात रोज सव्वादोन लाख गाठींची गरज वस्त्रोद्योगाला व बिगर वस्त्रोद्योगात आहे. पण रोज एक लाख ८० हजार ते एक लाख ८५ हजार गाठींची आवक होत आहे. देशातून कापूस निर्यात सुरू आहे. सुमारे ६० लाख गाठींची निर्यात देशातून सप्टेंबर २०२२ अखेरपर्यंत अपेक्षित आहे. पण देशातच मोठी मागणी यंदा आहे. यामुळे निर्यातीवर अवलंबून राहण्याची गरज यंदा कमी आहे.  उत्पादन कमी असतानाच मागणी पूर्ण करणे अशक्य होत आहे. दुसरीकडे आयातीबाबत मर्यादा आहेत. देशात न पिकणाऱ्या किंवा उत्पादित न होणाऱ्या सुमारे २५ लाख गाठींची आयात होवू शकते. यापेक्षा अधिकची आयात होणार नाही, असेही जाणकारांचे म्हणणे आहे.

देशात कापूस उत्पादन ३१५ लाख गाठींवर येईल. जानेवारीच्या मध्यापर्यंत कापूस आवकेत ४० लाख गाठींची तूट दिसत आहे. बाजारात तेजी आहे. बाजार पुढेही स्थिर राहील. देशात चांगली मागणी असल्याने निर्यातही घटू शकते.  - अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (पीक समिती)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.