‘रोहयो’ कामांच्या मुल्यांकनासाठी मापदंड

राज्यातील हजारो गावे आणि शिवारांमध्ये रोजगार हमी योजनेतून (रोहयो) होणाऱ्या विकास कामांचे यापुढे स्वयंमुल्यांकन बंधनकारक होणार आहे.
manrega
manrega

पुणे : राज्यातील हजारो गावे आणि शिवारांमध्ये रोजगार हमी योजनेतून (रोहयो) होणाऱ्या विकास कामांचे यापुढे स्वयंमुल्यांकन बंधनकारक होणार आहे. त्यासाठी मापदंड देखील तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.  

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये (मनरेगा) आता सहयोगी संस्था म्हणून नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) सहभागी करून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, या कामांसाठी संस्थांना कोणताही खर्च दिला जाणार नाही. त्याबाबत हेल्प इन्स्टिट्यूट फॉर नॅचरल डेव्हलपमेंटचे सचिव संजय शिंदे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे.

‘मनरेगा’ कामाचे नियोजन ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत सुनियोजित पद्धतीने व्हावे. त्यासाठी ग्रामपंचायतीने कामे निश्चित करावीत व अपेक्षित प्रत्येक कामाची फलश्रुती निश्चित करून ग्रामसभेची मान्यता घ्या, असे आदेश रोजगार हमी योजनेच्या मुख्यालयाने दिले आहेत. 

ग्रामसभेने कोणत्याही कामाला मान्यता देण्यापूर्वी कामाची उत्पादकता किंवा फलश्रुती तपासावी व त्यावर संनियंत्रण करावे. त्यासाठी राज्य शासनाच्या यंत्रणांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे फलश्रुती तपासल्याशिवाय ही कामे बंद करता कामा नये, असा इशारा देखील रोहयो प्रशासनाने राज्यातील ग्रामपंचायतींना दिला आहे. 

‘रोहयो’तून सध्या २७५ प्रकारची कामे केली जातात. मात्र, ही कामे दिशाहीन होतात. तसेच पंचायतीकडून त्यावर संनियंत्रण योग्य पद्धतीने ठेवले जात नाही. त्यामुळे यापुढे गावच्या कारभाऱ्यांना गुणवत्तेचे भान येण्यासाठी आता ‘‘मी समृध्द तर गाव समृध्द आणि गावांच्या समृध्दीतून राज्य समृध्द’’ अशी संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न ‘रोहयो’ प्रशासनाने सुरू केला आहे.  

स्वयंमुल्यांकन फलद्रुप हवेः दळवी  राज्यात ग्रामस्वच्छता, आदर्श गाव, सरकारी पातळीवरील ‘झिरो पेंडन्सी’ अशा विविध संकल्पनांमध्ये उल्लेखनीय काम केलेले माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी म्हणाले की, ‘‘रोहयो’तून गावशिवारांमध्ये होणाऱ्या कामांचे मूल्यांकन ही चांगली संकल्पना आहे. मात्र, ज्या यंत्रणेने कामे केली तेच लोक स्वयंमुल्यांकन करणार असतील तर ते फलद्रुप होणार नाही. कारण, अशा मुल्यांकनात सापडलेले दोष, तक्रारी किंवा कारवाईबाबत स्वयंमुल्यांकन करणारी यंत्रणा स्वतःविषयी बचावात्मक भूमिका घेईल.’’ मुल्यांकनात उलट पडताळणी (क्रॉस व्हेरिफिकेशन), दुरुस्ती आणि शास्ती अशा तीन पायाभूत मुद्द्यांचा समावेश नसल्यास मुल्यांकनाला अर्थ नसतो, असेही दळवी यांनी स्पष्ट केले.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com