
सिंधुदुर्ग ः परतीच्या पावसाने जिल्ह्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून जरी या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश नसले तरी नुकसान झालेल्या शेतीचे संयुक्त पंचनामे करून घ्यावेत, अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.
जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री श्री. सामंत यांचा जनता दरबार झाला. या जनता दरबाराला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आमदार वैभव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते. या जनता दरबारानंतर त्यांची श्री. सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सांवत, संजय पडते, संदेश पारकर, जान्हवी सांवत आदी उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले की, जिल्ह्यात परतीच्या पावसाने भातशेतीसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जरी शासनाने दिले नसले तरी नुकसानीचे पंचनामे तलाठी, कृषिसेवक, ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे करण्याचे आदेश देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. जेणेकरून शासनाकडून नुकसानीची माहिती मागितल्यानंतर विलंब होणार नाही. आजच्या जनता दरबारात जिल्ह्यातील १२८ अर्ज प्राप्त झाले होते. वैयक्तिक, महसूल, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, पोलिस विभाग, आरोग्य विभाग, आदी विभागाविषयीचे अर्ज होते.यातील काही अर्ज अधिकारी-कर्मचारी यांची मनमानी दर्शवीत आहेत.
पहिलाच जनता दरबार असल्यामुळे आपण कडक भूमिका घेणार नाही. परंतु पुढचा दरबार १२ नोव्हेंबरला होईल तत्पूर्वी हे प्रश्न निकाली निघायला हवेत अन्यथा आपल्याला कडक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील ७ लाख ७१ हजार २५४ लोकांचा सर्व्हे झाला आहे. सर्व्हेक्षणात १२२ रुग्ण सारीचे, ३०९ रुग्ण मलेरिया आणि डेग्यूचे तर २९९ रुग्ण कोरोनाचे आढळून आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.