चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात सुधारणा 

कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढीला फायदेशीर असल्याने अंडी, चिकन खाण्याचे प्रमाण वाढले.
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात सुधारणा 
poultry

नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढीला फायदेशीर असल्याने अंडी, चिकन खाण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे राज्यात अंडी, चिकनला गेल्या तीन महिन्यांपासून वीस ते पंचवीस टक्के मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात सुधारणा झाली आहे. सध्या राज्यात दैनंदिन साधारण अडीच कोटी अंड्यांची मागणी आहे. मात्र उत्पादन केवळ ८० लाखांवर आहे. तर एक कोटी ते एक कोटी वीस लाख अंडी परराज्यातून येत आहेत. पन्नास हजार अंड्यांची तूट आहे.  

वाढत्या कोरोना संसर्गामुळे शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढीसाठी चिकन, अंडी खावे, असा सल्ला दिला जात असल्याने लोकांकडून गेल्या तीन महिन्यांपासून चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे. कोरोनापुर्वी राज्यात दैनंदिन साधारण दोन कोटी अंड्याची मागणी होती. आता ही मागणी अडीच कोटींवर गेली.तर दैनंदिन उत्पादन ८० लाख आहे. शिवाय एक कोटी वीस लाखाच्या जवळपास अंडी तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू राज्यातून येतात. सध्या पन्नास लाख अंड्यांची तूट आहे. 

मागणी वाढल्याने दरात घाऊकमध्ये साधारण दीड ते दोन रुपयांनी सुधारणा झाली. पूर्वी तीन ते सव्वा तीन रुपयाला विकणारे अंडे आता पाच ते सव्वा पाच रुपयाला विकले जात आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात प्रती अंड्याचे दर सात रुपये झाले आहेत. 

बॉयलर चिकनसह गावरान चिकनलाही मागणी वाढली आहे. घाऊक बाजारात साधारण सत्तर ते नव्व्द रुपये किलो दराने विकले जाणारे बॉयलर चिकन सध्या १३० रुपयांपर्यंत घाऊक व १८० ते २०० रुपये प्रतिकिलो दराने किरकोळ विक्री होत आहे. गावराण चिकनचे दरही घाऊकमध्ये १५० ते १७० असून किरकोळ दर ३०० रुपये किलोच्या घरात आहेत. केवळ मार्च महिन्यात झालेल्या नुकसानीमुळे अनेकांनी नव्याने कोंबड्याचे पालन बंद केल्याने ही तूट निर्माण झाली असल्याचे जाणकार सांगतात. 

प्रतिक्रिया कोरोना संसर्गावर अजून तरी औषध नाही. त्यामुळे शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याबाबत डॉक्टर सांगतात. अंडी खाल्ल्याने सर्वाधिक प्रतिकारशक्ती वाढते हे स्पष्ट झाल्याने मागणी वाढली आहे. सध्या अंड्याला काहीसी तेजी आली असली तरी अफवेच्या काळात मोठे नुकसान झाले, ते सहज भरुन निघणारे नाही.  - शाम भगत, अध्यक्ष, अंडी उत्पादक समन्वय समिती, महाराष्ट्र 

राज्यात चिकनला नियमीत मागणी असते, त्यापेक्षा दहा टक्के कमी उत्पादन होत आहे. त्यात मागणी वाढली असल्याने दरात वाढ झाली आहे. अंड्याला २५ टक्के मागणी वाढली आणि मागील सहा महिन्यांत झालेल्या नुकसानीमुळे अंड्याचे उत्पादन कमी झाल्याने दर वाढले. चिकन व अंड्याचा मागणीनुसार उत्पादन, पुरवठा व्हायला अजून चार महिन्याचा तरी कालावधी लागेल. मात्र आताचा मागणीचा काळ सोडला तर लॉकडाऊन व अन्य काळात पोल्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे.  - उद्धव आहेर, कुक्कुटपालन अभ्यासक व व्यवस्थापकीय संचालक, आनंद ॲग्रो ग्रुप, नाशिक   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com