चिखलदऱ्याच्या कॉफीला राज्यभरातून मागणी

कॉफी संपूर्ण महाराष्ट्रात अधिक क्षेत्राचा विचार केल्यास चिखलदऱ्यातच उत्पादित केली जात असावी. सरकारी यंत्रणेचेही या बागांकडे कमालीचे दुर्लक्ष आहे. ब्रिटिश गेल्यानंतर कोणीच कॉफीच्या बागा लावण्याचा प्रयत्न केला नाही.
चिखलदऱ्याच्या कॉफीला राज्यभरातून मागणी
Demand for Chikhaldarya coffee across the state

चिखलदरा, जि. अमरावती : कॉफी संपूर्ण महाराष्ट्रात अधिक क्षेत्राचा विचार केल्यास चिखलदऱ्यातच उत्पादित केली जात असावी. सरकारी यंत्रणेचेही या बागांकडे कमालीचे दुर्लक्ष आहे. ब्रिटिश गेल्यानंतर कोणीच कॉफीच्या बागा लावण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळेच कॉफीला राजाश्रय मिळाल्यास या भागातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. 

विदर्भात उष्ण वातावरणापासून सुटका मिळविण्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांनी चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाचा शोध लावला. या ठिकाणी कॉफीची लागवड होऊ शकते, हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी येथे कॉफीची लागवड केली. आज या ठिकाणी १२० टक्क्यांहून अधिक भागात कॉफीच्या बागा आहेत. कॉफीची झाडे ही मोठ्या झाडांच्या सावलीत वाढतात. कारण या झाडांना ऊन सहन होत नाही. सध्या ज्या भागात कॉफीची बाग आहे, त्या भागात आंबा, वड तसेच इतर सदाहरित झाडे आहेत. त्या-त्या झाडांच्या खाली कॉफीची झाडे वाढत आहेत.

ब्रिटिशांच्या काळात इंग्रज अधिकारी रॉबिन्स याने चिखलदऱ्यात १८२० मध्ये ६० ते ७० हेक्टर क्षेत्रात लावलेली कॉफीची बाग आजदेखील जशीच्या तशीच आहे. विशेष म्हणजे, इंग्रजांनी लावलेल्या कॉफीच्या या बागेवर आदिवासी युवकांना रोजगार मिळत आहे. मात्र या बागांची व्याप्ती वाढवून राजाश्रय मिळाल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. सध्या कॉफीच्या झाडांना लालबुंद फळे आहेत. 

कॉफीचे दोन प्रकार  कॉफीचे दोन प्रकार आहेत. ॲरॅबिका आणि रोबस्टा अशी त्यांची नावे. चिखलदऱ्यामध्ये ॲरॅबिका कॉफीची लागवड केली जाते. ही कॉफी प्यायल्याने वजन कमी होते, असा दावा केला जातो. १०० एकरांत ही १२० वर्षे जुनी बाग आहे. वार्षिक उत्पादन २० ते २५ क्विंटल आहे. कॉफी पावडर बनवून स्थानिक व्यापाऱ्यांना, तसेच मुंबई व बंगळूर येथे निर्यातही केली जाते. ३०० रुपये किलोप्रमाणे बिया व ५०० रुपये किलोप्रमाणे पावडर विकली जाते.

चिखलदरा येथील कॉफी ही ब्रिटिशकालीन आहे. महाराष्ट्र शासनाने या कॉफीच्या बागा वाढविण्यासाठी मदत करून चिखलदरा नगर परिषदेला मदत करावी. तसेच नगर परिषद कार्यालयातर्फे कॉफी लागवडीसाठी आणि कॉफीच्या बागांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जातील.  - विजया सोमवंशी, नगराध्यक्ष, चिखलदरा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.