दुष्काळावरील चर्चा बारगळली

दुष्काळावरील चर्चा बारगळली
दुष्काळावरील चर्चा बारगळली

मुंबई : भारत- पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सुरक्षेच्या कारणास्तव अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारी (ता. २८) आटोपते घेण्यात आले. अधिवेशन दोन दिवस आधीच संस्थगित झाल्यामुळे विधिमंडळात राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर होऊ घातलेली चर्चा बारगळली. राज्यात यंदा दुष्काळाची तीव्रता मोठी आहे, त्यामुळे विधिमंडळातील दुष्काळी चर्चेकडे दुष्काळग्रस्तांच्या नजरा लागल्या होत्या. विधिमंडळात चर्चा होऊन दुष्काळग्रस्तांना काहीअंशी दिलासा मिळाला असता अशी अपेक्षा होती. मात्र, दुष्काळग्रस्तांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करून याची माहिती दिली. हे अधिवेशन सुरक्षेच्या कारणास्तव संपुष्टात येत असले तरी कोणीही काळजी करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील अधिवेशन १७ जूनपासून मुंबईत होणार आहे.  भारत- पाकिस्तान या दोन देशांच्या सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने या ठिकाणी सर्वच महत्त्वाची कार्यालये आहेत. त्यामध्ये सध्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने विधानभवन आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. सध्याच्या परिस्थितीत मुंबईत सुरक्षेची गरज असून, अधिवेशनाच्या कर्तव्यावर असणारा सुमारे सहा हजार पोलिसांचा ताफा उपलब्ध झाल्यास पोलिसांवर असणारा ताण कमी होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलिस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.  गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात बैठक घेतली. या बैठकीला विरोधी पक्षनेते, सर्वपक्षीय गट नेते उपस्थित होते. या बैठकीत आजच अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपते घेण्याच्या निर्णयाला सर्वच राजकीय पक्षांनी सहमती दर्शवली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करीत अर्थसंकल्पीय अधिवेशन संपुष्टात येत असल्याची घोषणा केली. राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर अनेक माहिती प्राप्त होत असल्याने अधिकारी आणि पोलिस बलाचा उपयोग अन्यत्र करावा लागणार आहे. सध्या सुरू असणाऱ्या अधिवेशनासाठी सुमारे सहा हजार पोलिसांचे बळ वापरले जात आहे. त्यामुळे सुरक्षेवरचा ताण लक्षात घेऊन अधिवेशन स्थगित करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षांनी यासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांसह सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी याला पाठिंबा दर्शविला.  अधिवेशन आटोपते घेण्याबाबत मांडलेल्या ठरावाला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते जयंत पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख, शिवसेनेचे गटनेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिला. यानंतर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अधिवेशन संपल्याचे जाहीर केले अाणि राज्यपालांच्यावतीने पुढील अधिवेशनाची तारीख अध्यक्ष बागडे यांनी जाहीर केली. आता पुढील पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून मुंबईत होणार आहे. वर्धमान यांना परत आणण्याचा ठराव पाकिस्तान सैन्याच्या ताब्यात असलेले पायलट वर्धमान अभिनंदन यांना परत आणण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. विधानसभेत आमदार जितेंद्र अव्हाड यांनी याबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, आपल्या देशाचा पुत्र वर्धमान अभिनंदन हा पाकिस्तानच्या भूमीत आहे, त्याला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी आपण मागणी करू या. तो ठराव राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींना पाठवला जावा, त्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी आव्हाड यांची मागणी उचलून धरली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा ठराव मंजूर केला. दुष्काळग्रस्तांचा भ्रमनिरास यंदा अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेखाली आहे. दुष्काळग्रस्त नागरिक, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. रोजगाराअभावी नागरिकांचे स्थलांतर होत आहे. पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई भासते आहे, त्यामुळे विधिमंडळातील दुष्काळी चर्चेकडे दुष्काळग्रस्तांच्या नजरा लागल्या होत्या. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सरकार काही निर्णय किंवा योजना जाहीर करेल अशी आशा होती, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव अधिवेशन दोन दिवस आधीच संस्थगित केल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com