ऊस वाहतूक नियमावली रद्द केल्याने नाराजी

राज्यातील उसाची तोडणी व वाहतुकीच्या कपातीबाबत शासनाने आधीची नियमावली रद्द केल्याने गैरव्यवहाराला मोकळे रान मिळेल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Dissatisfied with the cancellation of sugarcane transport regulations
Dissatisfied with the cancellation of sugarcane transport regulations

पुणे ः राज्यातील उसाची तोडणी व वाहतुकीच्या कपातीबाबत शासनाने आधीची नियमावली रद्द केल्याने गैरव्यवहाराला मोकळे रान मिळेल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ऊसदर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य भानुदास शिंदे यांनी साखर आयुक्तालयाकडे याबाबत काही लेखी मुद्दे मांडले आहेत. नियमावली रद्द केल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच वाहतूक अंतराबाबत शासनाने निश्चित केलेल्या नियमांचा समावेश असलेले परिपत्रक पुन्हा लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

राज्य शासनाने शेतकरीहिताचा निर्णय घेत ८ मार्च २०१७ रोजी तोडणी वाहतूक नियमावली तयार केली होती. त्यानुसार ऊस वाहतुकीचे आंतरनिहाय  टप्पे केले गेले. २५ किलोमीटरपर्यंत पहिला, २५ ते ५० किलोमीटरपर्यंत दुसरा, आणि तिसऱ्या टप्प्यात ५० किलोमीटरपासून पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी वाहतूक खर्च गृहीत धरला जाणार होता. हा खर्च वजा करून शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) काढावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. 

शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, ऊसदर नियंत्रण मंडळाने या नियमावलीचे स्वागत केले होते. मात्र, कारखानदारांच्या विरोधामुळे या नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली नाही. कोरोनाच्या दोन वर्षामुळे या नियमांकडे कोणाचे लक्ष गेले नाही. आता हे नियम अचानक रद्द करण्यात आले आहेत. या नियमांमुळे वेगवेगळी एफआरपी देणे शक्य नसल्याचे सांगितले जाते. मात्र, यामुळे शेतकऱ्यांची लूट कायम चालू राहणार आहे. दोन साखर कारखान्यांसाठी २५ किलोमीटर अंतर ठेवण्याची अट आहे. या अंतराच्या आत ऊस आहे म्हणून गाळपासाठी परवाना दिला जातो. मग, बाहेरील बेकायदेशीर ऊस आणून त्याचा जादा वाहतूक खर्च सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या माथी मारणे चूक आहे. यामुळे कारखाने तोडणीवाहतूक खर्चापोटी प्रतिटन ६०० ते १३०० रुपये सर्रासपणे शेतकऱ्यांच्या बिलातून कापून घेतात, असे शेतकरी प्रतिनिधींचे म्हणणे आहे.  

आधीचीच नियमावली लागू करा ः रयत क्रांती दरम्यान, रयत क्रांती संघटनेने या मुद्द्यावर आंदोलनाचा इशारा दिला आहे. ‘‘आधीचीच वाहतूक टप्पा नियमावली लागू करावी. काटामारी, उतारा चोरी आणि तोडणी वाहतूक यामधील गैरप्रकार थांबविण्यासाठी कडक उपाय लागू करावेत,’’ अशी मागणी ‘रयत क्रांती’ने साखर आयुक्तालयाकडे केली आहेत.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com