दिवे येथील बाजार समितीचा प्रस्ताव शासनाला पाठविणार : राज्यमंत्री शिवतारे

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे

पुणे   ः झपाट्याने वाढणाऱ्या पुणे शहरासाठी दिवे (ता. पुरंदर) येथील ४०० एकर जागेवर बाजार समिती प्रस्तावित असून, या जागेची मोजणी आणि नकाशासह प्रस्ताव राज्य शासनाला येत्या १५ दिवसांत पाठविला जाईल. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदर या जागेचा शासकीय भाडेकरार बाजार समितीबरोबर केला जाईल, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. 

मंत्री शिवतारे यांनी रविवारी (ता. ६) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे बाजार समितीमधील विविध घटकांचे प्रश्‍न समजावून घेण्यासाठी मंत्री शिवतारे यांनी बाजार समितीला भेट दिली.

या वेळी शिवतारे म्हणाले, की केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राष्ट्रीय कृषी बाजार उभारण्यात येत आहे. हा बाजार आंतराष्ट्रीय दर्जाचा उभारण्यासाठी पुरंदर तालुक्‍यातील दिवे येथे चारशे एकर जागा देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी विभागीय आयुक्तांना दोन महिन्यांत अहवाल देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. सर्व आधुनिक सोयींनी युक्त अशी ही बाजारपेठ असेल. शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा फायदा होईल. प्रस्तावित विमानतळापासून काही अंतरावर हा बाजार होणार असल्यामुळे देशात कुठेही शेती माल पाठविणे शक्‍य होणार आहे. यासाठीची प्रक्रिया सुरू असून, जमिनीची मोजणी आणि नकाशा सह प्रस्ताव १५ दिवसांत राज्य शासनाला सादर केला जाईल.

‘डिजिटल काटे संगनमताने ॲडजेस्ट होऊ शकतात’ तोलाईबाबत सध्या वाद निर्माण झाले असून, याबाबत पणन संचालक आणि मंत्री समन्वयाने निर्णय घेतील. मात्र डिजिटल काटेदेखील संगनमताने ॲडजेस्ट होऊ शकतात. यामुळे तोलणार असावा, की नसावा हा शेतकऱ्यांचा प्रश्‍न आहे. शेतकऱ्यांची लूट तोलाईतून होणार असेल आणि शेतकऱ्यांची तोलणार नको अशी भूमिका असेल तर मी शेतकऱ्यांच्या भूमिकेशी सहमत आहे, असे मंत्री शिवतारे यांनी सांगितले.   ‘पुणे शहर शिवसेनेतील पोकळी भरून काढणार’  पुणे शहर शिवसेनेत खंबीर नेतृत्वाची पोकळी आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी मी स्वतः शहरात लक्ष घालणार असून, तशी मागणीदेखील पक्षप्रमुखांकडे केली आहे, असे मंत्री शिवतारे यांनी या वेळी सांगितले. खंबीर नेतृत्वाअभावी नागरिकांना प्रश्‍न कोणाकडे घेऊन जावे, असा प्रश्‍न निर्माण होतो. अशी परिस्थिती सध्या शहरात निर्माण झाली आहे. माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्यानंतर शहर शिवसेनेत पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी मी मंत्री म्हणून भरून काढणार आहे. आमचा पक्ष हा आदेशावर चालत असून, पक्षप्रमुखांनी आदेश दिला तर कोरड्या विहिरीतही उडी घेऊ असे म्हणत पुणे किंवा बारामती लोकसभा निवडणूक लढवू, असेही शिवतारे म्हणाले. या वेळी उपनेते तानाजी सावंत उपस्थित होते. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com