शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार मिळावा: डॉ. अनिल बोंडे

पुरस्कार
पुरस्कार

मुंबई (प्रतिनिधी)ः शेतकऱ्याचे उत्पादन दुप्पट झाले. आता उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. शेतीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणवंत शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी शिफारस करणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सोमवारी (ता. १) सांगितले.  वसंतराव नाईक कृषी संशोधन व सामाजिक प्रतिष्ठानच्या वसंतराव नाईक कृषी पुरस्काराचे सोमवारी कृषी दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण केंद्र येथे वितरण झाले. या वेळी ते बोलत होते.  ‘‘मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या हाताला काम दिले. तसेच शेतकऱ्यांनी शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय करावा यासाठीही त्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले. शेतकरी समृद्ध व्हावा हेच ध्येय वसंतराव नाईक यांनी बाळगले होते. शेतीमध्ये संशोधन होऊन उत्पादनात वाढ व्हावी यासाठी त्यांनी कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शेतीमध्ये यांत्रिकीकरण करून शेतकऱ्यांना कमी वेळेत अधिक उत्पन्न मिळण्यासाठी अथक प्रयत्न केले,’’ असेही डॉ. बोंडे म्हणाले.  ‘‘राज्य शासन शेतकऱ्यांसाठी जुने व अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार असून, पूर्ण झालेल्या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट शेतीपर्यंत पाइपलाइनच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देणार आहे. जलयुक्त शिवार अभियानामध्ये लोकसहभाग वाढला असून, याची फलश्रुती म्हणून राज्यातील अनेक गावे पाणीयुक्त झाली आहेत,’’ असेही कृषिमंत्री म्हणाले.  कृषिमंत्री डॉ. बोंडे यांच्या हस्ते कृषी दिन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी आमदार राजाभाऊ वाजे, हरिभाऊ राठोड, माजी मंत्री मखराम पवार, वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, संस्थेचे सचिव संजय नाईक आदी उपस्थित होते. कृषिमंत्री डॉ. बोंडे यांच्या हस्ते शेतीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा रोख रक्कम, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये कृषी शास्त्रज्ञ संजय भावे, गुणवंत शेतकरी सुधाकर रामटेके, भालचंद्र जोशी, शेतीविषयक उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल ‘ॲग्रोवन’चे बातमीदार सूर्यकांत नेटके, कृषी उत्पादन निर्यातदार नीलेश रोडे, फळ उत्पादक शेतकरी जोत्स्ना दौंड, भाजीपाला उत्पादक शेतकरी प्रकाश राऊत, दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादक विश्वजित देशमुख, पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे संजय करकरे आदी मान्यवरांचा यामध्ये समावेश आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com