पीकेव्ही २ बीटी वाणामुळे कापूस उत्पादकांना फायदाः डॉ. विलास भाले

पीकेव्ही 2 बीटी वाण
पीकेव्ही 2 बीटी वाण

अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन असलेल्या वाणाला महाबीजने बीटीच्या स्वरूपात आणले आहे. हा वाण आल्याने आता आपण कापसाच्या बाबतीत स्वंयपूर्ण झालो आहोत. हा वाण अत्यंत चांगला असून तो बीटीमध्ये नसतानाही शेतकऱ्यांनी यापूर्वी चांगले उत्पादन घेतले. काळानुरूप आता हा वाण बीटीमध्ये उपलब्ध झाल्याने कापूस उत्पादकांना अधिक उत्पन्न काढता येईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केला. कृषी विद्यापीठ व महाबीजतर्फे सोमवारी (ता. २४) पीकेव्ही हायब्रीड २ या बीटी वाणाचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर, महाबीजचे महाव्यवस्थापक (उत्पादन) सुरेश पुंडकर, डॉ. प्रफुल्ल लहाने, प्रकाश टाटर, विभागीय व्यवस्थापक बबनराव लुले, सीड सर्टीफिकेशन ऑफिसर पी. व्ही. उन्हाळे, कापूस वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉ. डी. टी. देशमुख यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ. भाले पुढे म्हणाले, पीकेव्ही २ हा वाण कीडरोगांना फारसा बळी पडत नाही. विदर्भासाठी हा वाण पोषक असून त्याची उत्पादकता इतर वाणांच्या तुलनेत चांगली आहे. या वाणामुळे बाजारपेठेत खासगी कंपन्यांची असलेली मक्तेदारी मोडता येईल. आणखी काही वाणांमध्ये बीटी जीन टाकला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी विद्यापीठाने नवनवीन वाण, तंत्र देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. अनिल भंडारी म्हणाले, राज्यात पीकेव्ही २, नांदेड ४४ हे प्रचलित वाण आहेत. पीकेव्ही २ हा कापूस वाण या भागासाठी पोषक आहे. पहिल्यावर्षी १८ हजार पाकिटे दिली आहेत. पुढील हंगामात साडेतीन लाख पाकिटे देण्याचे नियोजन आहे. एन ४४ हा वाण मराठवाड्यात दिला आहे. महाबीजने आता कापसाच्या सरळ वाणात जीन टाकून बीटी वाण आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी २८ मे रोजी सीआयसीआर सोबत करारसुद्धा केला. सूरज आणि रजत ०८१ या सरळ कापूस वाणात बीटी जीन टाकला जाईल. पुढील हंगामात याचे ३०० क्विंटल बियाणे उपलब्ध करणार असून १२०० हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जाईल. प्रास्ताविकात डॉ. डी. टी. देशमुख यांनी पीकेव्ही २ या वाणाची गुणवैशिष्ट्ये सविस्तरपणे मांडली. शेतकरी प्रतिनिधी म्हणून कापूस उत्पादक गणेशराव नानोटे यांनी पीकेव्ही २ या वाणाविषयी अनुभव सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आम्रपाली आखरे यांनी केले. कार्यक्रमासाठी कापूस संशोधन विभागाचे डॉ. प्रशांत नेमाडे, डाॅ. सुरेंद्र देशमुख, गोदावरी गायकवाड, प्रा.विवेक देशमुख, श्री. राखोंडे यांच्यासह इतरांनी पुढाकार घेतला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com