ऊसतज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव हापसे यांचे निधन

एकरी १०० टन ऊस उत्पादन चळवळीचे प्रणेते, यासाठीच्या ‘डॉ. हापसे तंत्रज्ञान’ म्हणून ओळखले गेलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ऊस शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानदेव गंगाराम हापसे (वय ८२) यांचे शनिवारी (ता. २८) हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात राहत्या घरी निधन झाले.
Dr. Dnyandev Hapse passed away
Dr. Dnyandev Hapse passed away

पुणे/नगर : एकरी १०० टन ऊस उत्पादन चळवळीचे प्रणेते, यासाठीच्या ‘डॉ. हापसे तंत्रज्ञान’ म्हणून ओळखले गेलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ऊस शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानदेव गंगाराम हापसे (वय ८२) यांचे शनिवारी (ता. २८) हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात राहत्या घरी निधन झाले. रविवारी (ता. २९) त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे तीन मुली व पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने ऊस उत्पादक शेतकरी, कृषी विद्यापीठ परिवार, ऊस संस्था आणि साखर उद्योगात दुःख व्यक्त करण्यात येत आहे. 

डॉ. हापसे नगर जिल्ह्यातील नेवासा बुद्रुक (ता. नेवासा) येथील मूळ राहिवासी होते. नेवाशात प्राथमिक, माध्यमिक शिक्षणानंतर एमएससी कृषीपर्यंतचे महाविद्यालयीन (१९७१ ते १९७५ या काळात) शिक्षण पूर्ण केले. अमेरिकेतील पेन्सिल्हानिया स्टेट युनिव्हर्सिटी व भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली यांच्या संयुक्त कार्यक्रमांतर्गत ‘कृषी-वनस्पती क्रियाशास्त्र’ विषयात त्यांनी पीएचडी केली. १९६८ ते ९१७५ या काळात गहू संशोधन केंद्र निफाड (जि. नाशिक), कृषी धुळे व कृषी महाविद्यालय पुणे येथे प्राध्यापक म्हणून काम केले.

 डाॅ. हापसे यांचे ‘अॅग्रोवन’शी अतुट नाते शेती क्षेत्राला वाहून घेतलेल्या ‘ॲग्रोवन’शी डॉ. हापसे हे सुरुवातीपासून जोडले गेले होते. इक्रिसॅट आणि ॲग्रोवनच्या माध्यमातून ऊसशेतीतील आधुनिक पट्टा पद्धतीबाबत महाराष्ट्रभर मेळावे घेण्यात आले होते. या मेळाव्यांतून शेकडो शेतकऱ्यांना डॉ. हापसे यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर डॉ. हापसे ॲग्रोवनमध्ये नियमितपणे लिखाण करीत होते. त्यामुळे त्यांचे ॲग्रोवनशी अतुट नाते निर्माण झाले होते.

ऊस क्षेत्रातील भीष्माचार्य म्हणून डॉ. हापसे यांचा उल्लेख करता येईल. ते माझे गुरू होते. १९९८ ला एकरी २० टनांवरून आतापर्यंत १६८ टनापर्यंत ऊस उत्पादनात भरारी मारू शकलो, त्यात डॉ. हापसे यांचा मोठा वाटा आहे. ऊस शेतीच्या सर्व घटकांचे परिपूर्ण ज्ञान असणारा ज्ञानकोश गेला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्या निधनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मार्गदर्शक हरपला आहे.   - कृषिभूषण संजीव माने, आष्टा, जि. सांगली

१९७६ मध्ये ऊस संशोधक म्हणून ऊस संशोधन केंद्र पाडेगाव (जि. सातारा) येथे ऊस विशेषज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी तेथे नऊ वर्षे काम केले. येथील ऊस संशोधनातून उसाचा नवीन प्रजाती प्रसारित करत पिकांचे व्यवस्थापन चांगले ठेवले, तर एकरी १५० टनांपेक्षा अधिक उसाचे उत्पादन निघू शकते हे त्यांनी दाखवून दिले. 

१९८६ मध्ये सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी उसाच्या संशोधनात काम सुरूच ठेवले. आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह सात राज्यांत, तसेच नेपाळ, ब्राझील व फिजी देशातही त्यांनी उसाच्या उत्पादनाबाबत मार्गदर्शन केले. वसंतदादा साखर संस्थेत (व्हीएसआय) प्रमुख शास्त्रज्ञ व संचालक म्हणून त्यांनी दहा वर्षांपेक्षा अधिक काळ काम केले. त्यांनी ऊस विषयावर पाच पुस्तके व २०० पेक्षा अधिक शास्त्रीय लेख लिहिले आहेत. अनेक कारखान्यांत तज्ज्ञ संचालक म्हणून ते कार्यरत होते. 

महाराष्ट्र राज्य साखर संघ, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने संघ, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी, असोसिएशन ऑफ, शुगरकेन टेक्नो. ऑफ इंडिया आदी सहकारी आणि खासगी संस्थांवर विविध पदांवर कार्यरत होते. निवृत्तीनंतर ज्ञानशील प्रतिष्ठान व डॉ. डी. जी. हापसे ॲण्ड असोसिएट्‍स या दोन संस्था त्यांनी स्थापन केल्या. 

कार्यसिद्धी... भात शेतीतील तणांचा बंदोबस्त, उत्पादनवाढ तंत्र विकास, क्षार जमिनीत भात पिकावरील परिणाम, पांढरीफुली गवताचा बंदोबस्त, जलपर्णी, हरळ, लव्हाळा, दुधनी तणांचा बंदोबस्त यांविषयांवर त्यांनी संशोधन केले. ज्वारी, मिरची, कापूस, गहू, तेलबिया, भात संशोधनास त्यांनी मार्गदर्शन केले. 

गहू संशोधन मेक्सिकन गव्हाच्या जातींचे अधिक उत्पादनासाठी वनस्पती शरीरक्रिया शास्त्राचा अभ्यास, विशेषतः मुलांची वाढ व कार्य, वाढीचा अभ्यास त्यांनी केला. कल्याण सोना, सोनालिका आदी जातींच्या प्रतीचा अभ्यास त्यांनी केला. निफाड ५४३९, ५६४३ आदी जाती शोधण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. कोरडवाहू गव्हाचे जास्त उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात त्यांचे योगदान होते. 

ऊस संशोधन (पाडेगाव) उसाच्या को. ७२१९ (संजीवनी), को. ७५२७ (संपदा), एमएस ६८४७ या जास्त उत्पादन व साखर उतारा देणाऱ्या जाती त्यांनी विकसित केल्या. को. ८०१४ (महालक्ष्मी), को ८६०३२ या आशादायक वाणांची निवड केली. संशोधनासह ऊस उत्पादकात  वाढीसाठी त्यांनी राज्यात चळवळच उभी केली. एकरी १०० टन (हेक्टरी २५० टन) ऊस उत्पादनासाठी डॉ. हापसे यांनी प्रशिक्षण कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्रांचे राज्यभर आयोजन केले, सहभाग नोंदविला. खोडवा उत्पादन  वाढ तंत्र, अधिक उतारा मिळण्यासाठीचे तंत्र, आंतरपिके, तणनियंत्रण आदी विषयांवर त्यांनी पाडेगाव ऊस संशोधन केंद्र आणि निवृत्तीनंतरही विविध संस्थांमार्फत मार्गदर्शन केले. 

‘व्हीएसआय’मध्ये मोलाचे योगदान वसंतदादा साखर संस्थेतील कार्य जागतिक पातळीवर उंचाविण्यासाठी डॉ. हापसे यांचे योगदान मोलाचे राहिले. या संस्थेत मुख्य कृषी विद्यावेता व विभाग प्रमुख, कृषी शास्त्र आणि तंत्रज्ञान विभागात कार्यरत होते. पुढे याच संस्थेचे ते १९८६ ते १९९५ दरम्यान संचालक होते. संस्थेत ऊस उत्पादन तंत्रज्ञान व्यवस्थापन, सहजीवी पदार्थ निर्मिती, तंत्रज्ञान, पर्यावरण, साखर उतारा आदी बहुतांश संबंधित विषयात त्यांनी काम केले. ऊस तंत्रज्ञान विषयात महाराष्ट्र आणि देशाला अग्रस्थान स्थान मिळवून देण्यात ते सतत कार्यरत असत. संस्थेत विविध परिसंवाद, चर्चासत्रे, प्रशिक्षण कार्यक्रम घेतले. विशेषत: ‘ऊस शेती ज्ञानयाग’ हा स्वतंत्र प्रशिक्षण वर्ग सुरू केला, ज्याचा शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी फायदा झाला. त्यांच्या एकरी १०० टन उत्पादन कार्यक्रमाकरिता जमीन, खत, पाणी, पीक, संरक्षण तंत्राची त्यांनी रूपरेषा ठरविली. 

डॉ. हापसे यांच्या निधनाचे वृत्त समजताच माजी सनदी अधिकारी दिलीप बंड, संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, उद्योजक आबासाहेब ताकवले, रोहिदास मोरे, प्रणव पवार, कृषी क्षेत्रातील प्रशांत नंदरगिकर, जयदेव बर्वे, स्मार्टकेम फर्टिलायझर्सचे सहयोगी उपाध्यक्ष विजयराव पाटील, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे विश्‍वस्थ समीर वाघ यांनी हापसे परिवाराची भेट घेतली व सांत्वन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com