‘महाडीबीटी’मुळे ‘ठिबक’ला वेग मिळेल

ठिबक व तुषार संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना ५१८ कोटी रुपये वाटप करण्याच्या कार्यक्रमाला मंजुरी मिळाली आहे.
drip irrigation
drip irrigation

पुणे : ठिबक व तुषार संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना ५१८ कोटी रुपये वाटप करण्याच्या कार्यक्रमाला मंजुरी मिळाली आहे. योजनेचा समावेश आता ‘महाडीबीटी’त झाल्याने कामकाज पारदर्शक व जलदपणे होईल, अशी माहिती राज्याच्या फलोत्पादन विभागातील सूत्रांनी दिली. 

ठिबकसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याकरिता केंद्राकडून अब्जावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. मात्र यंदा निधी वेळेत खर्च झालेला नाही. निधी असूनही प्रशासकीय मान्यता रखडली. तसेच मार्गदर्शक सूचना काढण्यासाठी कृषी आयुक्तालयाच्या ठिबक कक्षाला दहा महिन्यांचा कालावधी लागला. यामुळे शेतकरी तसेच ठिबक उद्योगाला मनस्ताप सहन करावा लागला आहे. 

‘‘राज्यात चालू २०२०-२१ करिता सूक्ष्म सिंचनाचा कार्यक्रम राबविण्यासाठी कृषी खात्याकडून केंद्राकडे वेळेत आराखडा पाठविला गेला होता. केंद्राने ६६६ कोटी रुपये खर्च करण्यास मान्यतादेखील दिली होती. मात्र राज्य शासनाने दुरुस्ती सुचवीत आराखडा ५१८ कोटी रुपयांवर आणला. कोविडमुळे आर्थिक अडचणी आल्यामुळे काही प्रक्रियांना उशीर झाला. अर्थात, या कालावधीमध्ये योजनेचे कामकाज थांबलेले नव्हते,’’ असे फलोत्पादन विभागाचे म्हणणे आहे. 

‘‘सूक्ष्म सिंचनाच्या कार्यक्रमाला मंजुरी मिळताच लगेच मार्गदर्शक सूचना काढता येत नाहीत. त्यासाठी आधी राज्याकडून निश्‍चित किती निधी मिळणार व निधीला प्रशासकीय मंजुरी आहे की नाही याबाबी विचारात घेतल्या जातात. मंत्रालयातून प्रशासकीय मंजुरी आल्यानंतरच आयुक्तालयाकडून मार्गदर्शक सूचना काढल्या जातात. तोपर्यंत मागील सूचना लागू असतात. तसेच मान्यता येईपर्यंत शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज स्वीकारणी चालूच होती,’’ असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.    ‘महाडीबीटी’ पोर्टलवर यंदा ठिबक अनुदान मागणी अर्जाची प्रक्रिया परिपूर्णरीत्या राबविली जाणार आहे. सर्व कामे यात ऑनलाइन व वेगाने होतील. यामुळे शेतकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही. पूर्वसंमती, मोका तपासणी, अंतिम मंजुरी या सर्व प्रक्रिया आता जलद होतील. सध्या पोर्टलवर तीन लाख १० हजार शेतकऱ्यांचे प्रस्ताव आले आहेत. हे प्रस्ताव छाननीसाठी विचारात घेतले जातील, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.  गेल्या वर्षीचे २३० कोटी रुपये वाटणार  ठिबक व तुषार संचासाठी चालू आर्थिक वर्षातील निधी वापरला जाईलच; पण  २०१९-२० मधील प्रलंबित २३० कोटी रुपयांच्या अनुदानाचे वाटप केले जाणार आहे. अनुदान वाटपात मार्गदर्शक सूचना हा मुद्दा गौण असतो. आम्ही नव्या सूचना जारी होईपर्यंत आधीची नियमावली वापरतो. मात्र मुख्य मुद्दा प्रशासकीय मान्यतेचा असतो. ही बाब मंत्रालयाच्या अखत्यारित येते, असे मत सूत्रांनी व्यक्त केले. प्रतिक्रिया... राज्यात सूक्ष्म सिंचन कार्यक्रमातील योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलदपणे मिळण्यासाठी ‘महाडीबीटी’ प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. दुसरे असे, की ‘ठिबक’च्या मार्गदर्शक सूचना यंदा बदलण्यात आलेल्या आहेत. त्यात नेमका काय बदल केला, याचा अभ्यास करण्यासाठी मी फाइल मागवून घेतली होती. नियमांचा अभ्यास करणे व त्यासाठी माहिती मागवून घेणे हेच माझे काम आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी ते मी करत राहीन.  - धीरज कुमार, कृषी आयुक्त 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com